बाप रे बाप..! किती हे साप? ९० जणांना घेतला सापाने चावा; जिल्ह्यातल्या ६,५०४ जणांना कुत्रे चावले! आरोग्य तज्ञ म्हणतात....
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असताना, बुलडाणा नगरपालिकेकडे तक्रारी वाढत गेल्या. त्यामुळे बुलडाणा नगरपालिकेने कराड येथील वेट फॉर ॲनिमल या संस्थेला कुत्र्यांच्या नसबंदीचा कंत्राट दिला. किती कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. ती नगरपालिकेलाच माहित.कारण एका कुत्र्या मागे १९०० ते २००० रुपये खर्च होत असल्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर नितीन देवलकर यांनी मोहिमे दरम्यान सांगितले होते. ही मोहिम जास्त दिवस चालली नाही. जिल्ह्यातील इतर ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली नाही. परिणामी २०२२ या वर्षात ६,५०४ श्वान दंश झालेत. शहरी व ग्रामीण भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. ते वाहनचालकांच्या अंगावर येतात, अनेकवेळा पाठलाग करतात, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. श्वानांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने, त्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. रात्रीच्यावेळी हे श्वान गाड्यांचाही पाठलाग करतात. दुचाकी चालकांची यामुळे तारांबळ उडते. अनेकवेळा हे दंश करतात आणि त्याची नाहक शिक्षा भोगावी लागते.
९० जणांवर उगारला फणा!
पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. नदीला पूर आल्यानंतर गवतात किंवा शेतात बसलेले विविध साप हे जीव वाचविण्यासाठी माळरान किंवा वस्तीच्या ठिकाणी जातात. ज्या ठिकाणी पाणी नाही,अशा शेतात किंवा गवतांच्या गंजीमध्येच विसावा शोधतात. याची कल्पना आली नसल्याने अनेकांना सर्पदंश झाला आहे. ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागातील मैदानावर गवत वाढलेले असते. याच मैदानाचा आसरा घेतलेले साप मैदानावर खेळत असणाऱ्या मुलांना दंश करतात. गेल्या वर्षात ९० जणांना सापाने दंश केलाय.
देशात २३६ जातींचे साप आढळतात. यांपैकी नाग, घोणस, मण्यार, फुरसे असे विषारी साप आहेत,तर बहुसंख्य साप हे बिनविषारी आहेत.त्यामुळे साप चावल्यानंतर घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे.