अतीवृष्टीने शेतकरी संकटात! अधिकाऱ्यांना घेऊन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; म्हणाले,निकष न लावता सरसकट नुकसानभरपाई द्या..
Wed, 12 Oct 2022

सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल, ११ ऑक्टोबरला सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावात कोसळधार पाऊस झाला. या पावसाने सोयाबीन, कपासी या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. ऐन पीक काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असल्याने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आज, १२ ऑक्टोबरला अधिकाऱ्यांना घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
सिंदखेडराजा तालुक्यातील सेलू - भोसा या परिसरात काल अतिवृष्टी झाली. त्यामुळे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आ.डॉ शिंगणे शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. कपाशी व सोयाबीन चे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई साठी कोणतेही निकष लावू नका.
तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाईच्या सूचना यावेळी आ. डॉ.शिंगणे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सतीश म्हस्के, परमेश्वर किंगर,नितीन शेळके यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.