रोह्यांच्या त्रासाला वैतागलेले शेतकरी हातात दोऱ्या घेऊन गळफास घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात घुसले! यंत्रणांची तारांबळ! अखेर....!

 
fghgf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  रोह्यांच्या त्रासाला वैतागलेले अंचरवाडी, वसंतनगर येथील शेतकरी आज, बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात गळफास घेण्यासाठी घुसले. यावेळी झालेल्या या प्रकारामुळे पोलीस विभागासह प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढून तातडीने तोडगा काढण्यासाठी पावले उचलल्याने पुढील अनर्थ टळला. 

चिखली तालुक्यातील अंचरवाडी व वसंतनगर  येथील शेतकरी  रोह्यांच्या त्रासाला प्रचंड वैतागले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक रोह्यांनी उध्वस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी २१ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देत पंचनामा करण्याची मागणी केली होती. मात्र दोन दिवसांत पंचनामे न झाल्याने २० ते २५ शेतकऱ्यांनी आज, २४ जुलै रोजी हातात दोऱ्या घेऊन गळफास घेण्यासाठी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठले. मात्र वेळीच बुलडाणा शहर पोलीसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठले.

वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे  यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्यासाठी पावले उचलली. वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. जंगल परिसराला ताराचे कंपाऊंड करण्यासाठी शासनस्थरावर पाठपुरावा करणार असण्याचा शब्दही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ठरलेल्या वेळेत पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच समाधान परिहार यांनी दिला. यावेळी अंचरवाडी, वसंतनगर येथील शेतकरी उपस्थित होते.