शेतकऱ्यांनो सावधान! जिल्ह्यात अतिविषारी घोणस अळीचा शिरकाव! स्वतःला आणि पिकाला कसे वाचवायचे ते वाचा...

 
aali
खामगाव ( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अस्मानी आणि सुलतानी संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा एक संकट घोंगावू लागले आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या घोणस अळीची जिल्ह्यात एन्ट्री झाली असून खामगाव तालुक्यातील पातोंडा पेंडका येथील शेतकरी शंकर भिकाजी कवळे यांच्या शेतात ही अतिविषारी घोणस अळी आढळली आहे.

या अळीचा केवळ स्पर्शही झाला तरी शरीराचा चट्टे पडतात. प्रचंड वेदना होतात. त्यामुळे या घोणस अळीपासून स्वतःला आणि पिकांना कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. बहुभक्षी विषग्रंथी असलेली घोणस अळी आढळल्याने शेतकऱ्यांसह शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांची चिंता वाढली आहे. या अळी पासून स्वतःला आणि पिकांना वाचविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व पिकांवर  कीटकनाशक फवारणी आवश्यक आहे. या अळी च्या केसात, काट्यात  विषग्रंथी असून काटा त्वचेमध्ये टोचल्यास खूप आग होते, त्वचा लाल होते, त्वचा सुजते, डोळे लाल होतात प्रसंगी तापही येऊ शकतो.

अळीचा दंश झाल्यावर काय करावे..?
 
शेतात काम करतांना अळीचा त्वचेशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. अळीने दंश केल्यास त्या ठिकाणी चिकट टेप लावून हलक्या हाताने काढावा. बेकिंग सोडा व पाणी याची पेस्ट लावावी. लक्षणे अधिक असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अळी कुठे आढळते..? शेतातील बांधावरच्या गवतावर या अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. याशिवाय एरंड, आंब्यांच्या झाडावर, पिकांवर व सोयाबीन वर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.