गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या! २ लाख रुपयांचे कर्ज होते; भादोला येथील घटना..
Nov 11, 2022, 09:23 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. या कारणामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तेजराव मोतीराम भगत(५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
तेजराव भगत हे अल्पभूधारक शेतकरी होते. भादोला शिवारात त्यांच्याकडे एक एकर शेती होती. त्यांच्यावर जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे पावणे तीन लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडीची चिंता त्यांना होती. त्या विवंचनेत त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.