लाडक्या बाप्पाला आज निरोप! ८० टक्के पोलीस बंदोबस्तासाठी तैनात! जिल्ह्यातील १०१ संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा कडक वॉच

 
ganpati
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   भक्तांच्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्यात देण्यात येत आहे. १० दिवसांचा उत्सव आटोपल्यानंतर बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. दरम्यान दोन वर्षांच्या कोरोनानंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव पार पडला. आज विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण पोलिसांच्या ८० टक्के पोलीस बंदोबस्त हा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लावण्यात आला आहे.

यंदा जिल्ह्यात ९५४ गणेश मंडळांनी नोंदणी केली होती. ज्या गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊन गणेश स्थापना केली होती अशा मंडळांनाच मिरवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या ७ आणि संवेदनशील असलेल्या ९४ अशा एकूण १०१ ठिकाणांवर पोलिसांचा कडक वॉच असणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्यात १ एसपी, ४ अप्पर पोलीस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, २६ पोलीस निरीक्षक, ४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५८ पोलीस उपनिरीक्षक आणि २०२२ सहाय्यक फौजदार ते अंमलदार असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एसआरपीच्या दोन कंपन्या, होमगार्ड व बाहेरून बोलावलेले पोलीस अशा दीड हजार जणांचाही या बंदोबस्तात समावेश आहे. याशिवाय १ शीघ्र कृती दल व ४ आरसिपी पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तासाठी जवळपास २०१ वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
    
विसर्जनासाठी ८५ घाट

जिल्ह्यात गणेश मूर्ती विसर्जनासाठी ८५ घाट उभारण्यात आले आहेत. याशिवाय काही ठिकाणी नदी व तलावांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात शहरी भागात ३४० तर ग्रामीण भागात ६१४  गणेश मंडळांनी नोंदणी केली होती.