पत्रकारांसह कुटुंबियांचे नेत्रतपासणी शिबिर यशस्वी! डॉ.राहुल बाहेकर म्हणाले, समाजहिताच्या पत्रकारीतेसाठी स्वच्छदृष्टी हवी

 
yhfg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):समाजाच्या व्यथा मांडण्याचे काम पत्रकार करतात त्यामुळे पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. समाजहिताच्या पत्रकारितेसाठी स्वच्छदृष्टी असणे आवश्यक आहे, त्यामुळे पत्रकारांची दृष्टी निकोप असावी यासाठीच विशेष नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले, अशी माहिती प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल बाहेकर यांनी दिली.

संजीवनी नेत्रालय आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने बुलडाणा शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ७ जानेवारी रोजी नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राहुल बाहेकर बोलत होते. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी डोळ्यांची नियमित तपासणी करावी तसेच लहानमुलांसह सर्वच वयोगटामध्ये सध्या मोबाईल,कॉम्पुटरचा वापर वाढला आहे त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे आवश्यक आहे, असे यावेळी डॉ. राहुल बाहेकर यांनी सांगितले.

सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. सकाळी ११ वाजता धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलन करून या शिबिराला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर सुरु होते. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सदर शिबिर यशस्वी ठरले. डॉ. राहुल बाहेकर आणि डॉ. प्रिती बाहेकर यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसह एकूण शंभराहून अधिक जणांची या नेत्र तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच संजीवनी नेत्रालयाचे शरद सपकाळ, प्रशांत बांगर, निलेश जाधव, समाधान बाहेकर, किरण धाटे, प्रशांत देशमुख, कासीम आदींनी परिश्रम घेतले.