खळबळजनक..! समलैंगिक संबंधांतून ४७ वर्षीय कक्षसेवकाचा खुन; १९ वर्षीय तरुणाने आधी ठेवले संबंध, मित्रांनी चित्रीकरण करून मागितली खंडणी; पैसे न दिल्याने पाठविले यमसदनी! बुलडाणा शहर पोलिसांनी उलगडले गुपित

 
735685
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ४७ वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधांतून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून करणाऱ्या ७ आरोपीविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी आज, १६ मार्चला गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. श्रीराम पांडुरंग शेळके (४७, मुळ रा. कासोदा, ता.सिल्लोड, ह.मु धामणगाव बढे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या कमानीजवळ एका मोकळ्या शेतात एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीला आधी बुलडाणा व त्यानंतर  औरंगाबाद येथे हलवले होते. जखमी व्यक्ती हा पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक असलेला श्रीराम शेळके असल्याची ओळख पटली होती. ३० एप्रिल रोजी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान श्रीराम शेळके याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.
 
असा झाला उलगडा
पोलिसांनी तपासादरम्यान मृतक श्रीराम शेळके यांच्या कुटुंबीयांची व तो काम करत असलेल्या ठिकाणच्या  कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी गेल्या तीन महिन्यांपासून श्रीराम शेळके याला सतत कुणाचा तरी फोन यायचा तो त्यावर सतत बोलायचा आणि त्यानंतर अस्वस्थ व्हायचा असे  पोलिसांसमोर आले. दरम्यान पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत महत्वपूर्ण माहिती गोळा केली. त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
  
समलैंगिक संबंधांतून झाला खून
 मृतक मृतक श्रीराम शेळके हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक पदावर कार्यरत होता. बुलडाणा शहरातील सावित्रीबाई फुले नगरात राहणाऱ्या आनंद गवई (१९) याच्याशी काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवरून ओळख झाली होती. दोघांमध्ये फेसबुकवर चॅटिंग होत होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईलवर आनंद आणि श्रीराम यांचे सातत्याने बोलणे व्हायचे. दोघांमध्ये व्हॉट्स ॲपवरून समलैंगिक संदेश , फोटो व व्हिडिओची देवाणघेवाण होत होती. त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक निर्माण झाली होती.

२९ मार्च २०२२ रोजी आनंदने श्रीरामने बुलडाण्याला भेटायला बोलावले होते. खामगाव रोडवरील कोठारी शोरुमजवळ दोघांची भेट झाली. त्यादिवशी  आनंदचा मित्र शाश्वत खंदायता यांच्या घरी कुणी नसल्याने घराची चाबी आनंदने घेतली होती. त्यानंतर दोघेही शाश्वतच्या घरी गेले. आनंदचा मित्र आदेश राठोड याला ही बाब माहीत झाल्याने त्याने हा प्रकार शाश्वतला सांगितला. आदेश आणि  शाश्वतने घराच्या मागच्या दरवाजाने गुपचूप प्रवेश केला त्यावेळी  आनंद आणि श्रीराम यांच्यात समलैंगिक संबंध सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. या संबंधाचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले आणि त्यानंतर लगेच खोलीत शिरून तो व्हिडिओ श्रीराम शेळके याला दाखवला आणि व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर पैशांची मागणी केली.

श्रीरामने  पैसे द्यायला नकार दिल्याने आदेश आणि  शाश्वतने त्यांचे मित्र चेतन वावरे , संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांना तिथे बोलावले.सगळ्यांनी मिळून श्रीरामला बेदम मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्याच्या अंगातील रक्ताने माखलेला शर्ट काढून शाश्वतच्या घरातील दुसरा शर्ट त्याच्या अंगात चढवला. त्यानंतर  बेशुद्धावस्थेतील श्रीरामला शाश्वतच्या चारचाकी वाहनात टाकून दुपारी साडेचारच्या सुमारास मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या मोकळ्या शेतात टाकून दिले. तिथेच श्रीरामची मोटरसायलकल सुद्धा आरोपींनी उभी करून दिली. आणि श्रीरामच्या अंगातील रक्ताने माखलेला शर्ट जाळून टाकला. रात्री साडेदहाच्या सुमारास फिरायला गेलेल्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली . त्यानंतर पोलिसांनी जखमी श्रीरामला आधी बुलडाणा व त्यानंतर औरंगाबाद रेफर केले होते.

 दरम्यान दुसऱ्या दिवशी आरोपींनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे मोटरसायकल आणि श्रीराम दिसला नाही. त्यामुळे तो शुद्धीत येऊन घरी निघून गेला असावा असे आरोपींना वाटले त्यामुळे ते गाफील राहिले. ३० मार्च रोजी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान श्रीरामचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी हा तपास हाती घेतला. श्रीरामच्या कुटुंबीयांचा, त्याच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर हा घातपात असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले.  तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आधी संशयित म्हणून आनंद गवईला ताब्यात घेतले.

त्याच्या  चौकशीनंतर त्याने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर काल, १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते साडेअकरा या अर्ध्या तासाच्या कालावधीत गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी व त्यांच्या पथकाने उर्वरित ६ आरोपींना एकाच वेळी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. आज याप्रकरणी आनंद गवई, शाश्वत खंदायता, आदेश राठोड, चेतन वावरे, संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आज सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. दरम्यान अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याचा उलगडा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी व रतनगीर गिरी यांचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी अभिनंदन केले आहे.