एल्गार मोर्चाने मोडला गर्दीचा रेकॉर्ड! रविकांत तुपकरांचा सरकारला आठवड्याचा अल्टीमेटम;मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाने महाराष्ट्र पेटेल म्हणाले;

जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी मोर्चाला विरोध केला, त्याच्या रेकॉर्डिंग जवळ असल्याचा केला दावा; म्हणाले, मोर्चाला विरोध करणाऱ्या नेत्यांचे आयुष्यात भले होणार नाही..

 
tupkar

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेतकऱ्यांची गर्दीच गर्दी, हातात रुम्हण घेऊन सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी घोषणा देणारे सगळ्या वयोगटातील आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी, प्रचंड पोलीस बंदोबस्त, अन् क्षणाक्षणाला टाळ्या आणि उस्फुर्त घोषणा मिळवणारी नेत्यांची आक्रमक भाषणे..  हे चित्र होते आज, ६ नोव्हेंबरला बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अतिविराट एल्गार मोर्चाचे. चिखली रोडवरील मोठ्या देवीपासून सुरू झालेल्या या एल्गार मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभेत रूपांतर झाले. यावेळी रविकांत तूपकरांनी केंद्र व राज्य सरकारसहित जिल्ह्यातील नेत्यांना सुद्धा नाव न घेता चांगलेच धारेवर धरले. रक्ताचे पाट वाहले तरी चालतील पण सोयाबीनला साडेआठ हजार रुपयांपेक्षा एक रुपयाही कमी भाव घेणार नाही. आमच्या मागण्यांचा सरकारने ८ दिवसांत विचार करावा अन्यथा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्र पेटवेल असा इशारा त्यांनी दिला.

  tupkar

तारुण्याची १९ वर्षे मी चळवळीला दिली. घरादरांची, लेकरा बाळांची, आई वडिलांची पर्वा केली नाही. अनेक राजकारण्यांच्या जवळ  गेलो पण मला सत्तेच्या मोहात पडावं वाटल नाही, कारण तुमच्यासारखी प्रचंड प्रेम करणारी माणसं सोबत आहे. तुम्हाला पाहून मन भरून आले आहे. आयुष्यात नाही आमदार,  खासदार झालो तरी चालेल पण तुमच्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढेल असे म्हणत तुपकरांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.
    
 जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी मोर्चाला विरोध केला..!
  दरम्यान शेतकऱ्यांच्या या मोर्चाला डॉ.राजेंद्र शिंगणे, नाना पटोले यांनी समर्थन दिल्याबद्दल तुपकरांनी त्यांचे आभार मानले. जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी मोर्चाला विरोध केला. मोर्चाला जाऊ नका म्हणून गावागावात फोन केले. त्याचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत. योग्य वेळी ते आपण जाहीर करू. शेतकऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही विरोध केला, आयुष्यात तुमचं भल होणार नाही असे तुपकर "त्या" नेत्यांना उद्देशून म्हणाले. केंद्र सरकारने 2 नोव्हेंबरला स्टॉक लिमिट उठवली आणि जिल्ह्यातल्या नेत्यांच्या बातम्या आज पेपरात छापून आल्या. काल तर पत्रक काढायची स्पर्धाच लागली होती. तुम्ही फुकटचे श्रेय घेऊ नका. स्टॉक लिमिट उठवल्याने ४०० रुपये वाढले,तुम्ही उपकार केले का? उपकाराची भाषा करू नका, स्टॉक लिमिट का लावले याचे उत्तर द्या असे  आव्हान तुपकरांनी दिले. स्टॉक लिमिट उठवले हे नेत्याचे उपकार नाही हा आमच्या जनजागृतीचा परिणाम आहे. फुकटचे क्रेडिट घेऊ नका, सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे तुमचे काम आहे, त्यासाठीच तुम्हाला निवडून दिले आहे, ते तुमचे कर्तव्य आहे. स्टॉक लिमिट उठवली म्हणून उपकाराची भाषा करू नका असे तुपकर म्हणाले. आज स्टॉक लिमिट उठवल्याचे तुम्ही स्वागत करता  मग याच मुद्द्यासाठी मागच्या वर्षी  सरकारच्या दरबारी का गेले नाही असा सवालही तुपकरांनी यावेळी उपस्थित केला.

मोर्चा पाहून काहींच्या पायाखालची जमीन सरकली..! हा अतिविराट मोर्चा पाहून काहींच्या पायाखालची जमीन सरकली आहे. उद्या काही लोक म्हणतील मोर्चाला ह्यांनी पैसे दिले, त्यांनी पैसे दिले. शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून या मोर्चाचा खर्च केला आहे असेही तुपकर म्हणाले. 

tupkar

अन् ती बातमीच वाचून दाखवली..
दरम्यान मला जिल्ह्यातल्या काही नेत्यांच्या बुद्धीची किव येते असे म्हणत तुपकरांनी आजच्या वर्तमान पत्रात छापून आलेली एक बातमीच भर सभेत वाचून दाखवली. सोयाबीन  वरील आयात शुल्क माफ केल्यावर सोयाबीनचे भाव कमी होतात हे कुणालाही कळते, निर्यात शुल्क माफ केल्यावर भाव वाढतात. यांना केंद्र सरकारने स्टॉक लिमिट उठवली हे सुद्धा नीट सांगता येत नाही असे म्हणत आपल्याला या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते असा टोला तुपकरांनी लगावला.
 
सोयाबीन कापसाचे मांडले गणित.. यंदा शेतकऱ्यांची परिस्थिती बेकार आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च ३५ हजार तर उत्पन्न २० हजार रुपये आहे. कपाशीचा उत्पादन खर्च एकरी ४१ हजार तर बाजारभावाप्रमाणे उत्पन्न केवळ ३५ हजार रुपये आहे असे ते म्हणाले. सोयाबीनच्या देशातील एकूण उत्पादनापैकी २२ टक्के सोयाबीन तेल तर ७८ टक्के सोयाबीन हे सोयापेंड साठी वापरल्या जाते. देशात आवश्यक असलेली सोयापेंड बाजूला ठेवली तरी १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड उरते. ही  सोयापेंड निर्यात करायला प्रोत्साहन द्या ,असे केल्यास सोयाबीनचे भाव २ हजार रुपयांनी वाढतील असे तुपकर म्हणाले. हा मोर्चा भिक मागायला नाही तर हक्क मागायला, जास्त नाही रास्त मागायला असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.
    
सरकारच डोकं कुठय.?
 एकरी ४४ ते ४६ क्विंटल उत्पादन देणारी अमेरिकेतील जीएम सोयाबीनचे उत्पादन घेण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांना परवानगी नाही. मात्र त्या सोयाबीन पासून बनवलेली सोयापेंड व तेल भारतात आयात केल्या जाते, सरकारच डोकं कुठंय असा सवाल करीत भारतातील शेतकऱ्यांना जीएम सोयाबीन उत्पादनाची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली.

या आहेत मागण्या.. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या. चालू पीक कर्ज माफ करा. शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला कंपाउंड उपलब्ध करून द्या. बचत गटांचे कर्ज माफ करा. ज्या शेतकऱ्यांची गुरे लंपी  आजाराने दगावली आहेत त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या. १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा. खाद्यतेलावर ३० टक्के आयात शुल्क लावा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या रकमेवर होल्ड लावू नका. जे शेतकरी दोन्ही कर्ज माफीतून सुटले त्यांचे कर्ज माफ करा अशा मागण्या तुपकरांनी भाषणातून केल्या. आठ दिवसांचा सरकारला अल्टीमेटम देतो. मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्र पेटेल असे आंदोलन उभे करणार असल्याचे  तुपकर म्हणाले. सोयाबीन आणि कापूस घाईघाईत विकू नका असे आवाहन तुपकरांनी भाषणाच्या शेवटी केले.