देशाला दिशा देण्याची ताकद जिजाऊ चरित्रात-- डॉ.शोन चिंचोले यांचे प्रतिपादन! स्वराज्य स्वाभिमान यात्रेचे केळवद येथे जंगी स्वागत

 
4ffc
केळवद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रयतेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिली ते विचार तेव्हा व आजही देशासाठी उपयोगी आहे. मध्यप्रदेशातील लोक जिजाऊंच्या विचारावर भरारी घेत आहे. ही अभिमानाची बाब आहे यातून परराज्यात देखील जिजाऊंचा विचार रुसतोय. देशाला दिशा देण्याची ताकद  जिजाऊ चरित्रात आहे.असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांनी केळवद येथे केले.

दिनांक १५ जानेवारी रोजी केळवद येथे स्वराज्य स्वाभिमान यात्रेचे आगमन झाले. इंदोर येथील ॲड. स्वातीताई काशीद व त्यांचे पती युवराज काशीद यांच्या संकल्पनेतून स्वराज्य स्वाभिमान यात्रा मातृतीर्थ सिंदखेड राजा ते मध्य प्रदेशातील इंदोर अशी जात आहे. सिंदखेडची पवित्र माती एका कलश्यात घेऊन ही यात्रा जिल्ह्यातून निघाली आहे. इंदोरच्या जिजाऊ चौकात जिजाऊंचा भव्य पुतळा बसविला जात आहे. केळवद येथे १५ जानेवारी रोजी ग्रामस्थांनी यात्रेचे जंगी स्वागत केले. बसस्थानक परिसरात महिलांनी जिजाऊ पूजन केले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हॉटेल गुलमोहर येथे सभेचे आयोजन करण्यात आले. बुलडाणा येथील 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.तर माजी अध्यक्ष पत्रकार रणजितसिंग राजपूत, पदसिद्ध सचिव सुनील सपकाळ, राजेश हेलगे, डॉक्टर राजेश्वर उबरहांडे, एडवोकेट जयसिंगराजे देशमुख, सागर कळवाघे ,प्राध्यापक अनिल रींडे ,पवार सर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार गणेश निकम, सोहम घाडगे, राम हिंगे ,नंदू आप्पा बोरबळे ,गणेश कालेकर ,प्रभू खंडागळे ,नारायण वाणी, बद्रीनाथ भोलाणे ,ज्ञानदेव कालेकर, बाजीराव उन्हाळे, गोपाल वाघमारे, कृष्णा गवते, भगवान काळे, सनी पांढरे, अशोक मोहिते, भगवान पाटील,संतोषआखाडे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी बोलताना माजीअध्यक्ष रणजीतसिंग राजपूत म्हणाले की, जिजाऊंचा विचार तेवत ठेवण्याचे कार्य म्हणजे राष्ट्र कार्य आहे. हा विचार सर्वांनी पुढे घेऊन जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित करून यात्रेचे संकल्पक युवराज काशीत व  स्वाती काशीद यांना शुभेच्छा दिल्या. शिवरायांना अभिप्रेत आजची यात्रा असल्याचे  जयसिंग राजे यावेळी म्हणाले. सुनील सपकाळ व राजेश हेलगे यांनी आजची यात्रा जिजाऊंची शिकवण देणारी आहे असे सांगून जिजाऊ शिवरायांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. प्राध्यापक अनिल रिंढे यांनी यात्रेचे आयोजन यावर सविस्तर प्रकाश टाकला. पारंपारिक वेशातील स्त्री पुरुष ,भगवे ध्वज व जिजाऊ यांचा जयघोष यामुळे केळवद नगरीत शिवशाही अवतरली. संचालन नंदू आप्पा बोरबळे यांनी तर आभार पत्रकार राम हिंगे यांनी मानले.

 

ही तर  महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब-- तुपकर

 सिंदखेड राजा ते इंदोर अशी पैदल यात्रा काढणे व जिजाऊंच्या विचाराचा जागर करणे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यावेळी बोलताना म्हणाले. बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने त्यांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेचे आयोजक  स्वातीताई काशीद व युवराज काशीद हे मराठी माणसाचा स्वाभिमान असल्याचे तुपकर म्हणाले.