आवाज नको वाढवू... आईची शपथ हाय! अन्यथा ५ ते ७ लाख रुपये भरायची तयारी ठेवा!

 
dj
बुलडाणा(प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन वर्षाच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. परंतु डीजेचा धांगडधिंगा करू नका. पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्या,जुगारांचा खेळ मांडू नका, ६० डेसिबलच्या आत डीजे च्या आवाजाची मर्यादा ठेवा, उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिला आहे. 

बुलडाणा ही धार्मिक व सांस्कृतिक नगरी आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन उत्सव साजरे करतात. आजपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. त्यासाठी बाप्पांचे भक्त तयारीला लागले आहेत. मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव दरम्यान डीजे वाजवून आणि ध्वनी प्रदूषण केले तर, डीजे मालकासह गणेश मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकते. त्यामुळे ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होणार नाही,याची मंडळांना काळजी घ्यावी लागणार आहे.

शांततापूर्ण गणेश उत्सव कसा साजरा करावा या संदर्भात जिल्ह्यात शांतता समितीची बैठक घेऊन पोलीस अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. गणेश मंडळाने डीजेचे उल्लंघन केल्यास कोर्टामध्ये ५ ते ७ लाख रुपये तर आरटीओचा ६० ते ७० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. गणेशोत्सव शांततापूर्ण व निर्विघ्न पार पाडावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

किती आवाजाला शहरात परवानगी ? 

औद्योगिक विभागात दिवसा ७५तर रात्री ७०, वाणिज्य विभागात दिवसा ६५रात्री ५५, निवासी भागात दिवसा ५५ तर रात्री ४५, शांतता क्षेत्रात दिवसा ५०तर रात्री ४०डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.

पोलिसांची परवानगी आहे का?

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे. उत्सवात कोणते वाद्य वाजविणार? ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे.

विज जोडणी घेताना दक्षता घ्यावी

गणेश मंडळासाठी अधिकृतपणे वीज जोडणी घ्यावी. यापूर्वी अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे खबरदारी आवश्यक असून पावसामुळे मूर्तीचे पावित्र्य भंग होणार नाही, त्यासाठी वॉटरप्रूफ छत तयार करावे. याची देखील खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हृदयरोगाच्या रुग्णांना व लहान मुलांना त्रास

गणेशोत्सवात जोरजोरात गाणी वाजविली जातात. यामुळे हृदय रोगी व लहान मुलांना जास्त त्रास होऊ शकतो. कारण प्रकाश व आवाजामुळे मुलांच्या अभ्यासावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. डीजे ६० डेसिबल च्या आत वाजविण्याची मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाईला समोर जावे लागणार आहे.डीजेच्या आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्या. ध्वनी प्रदूषण टाळावे. पीओपी मूर्ती ऐवजी मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. मूर्तीचा आकार लहान असावा. जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर करावे. जुगाराचा खेळ मांडू नये. 

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणतात..

जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी शांतता समितीची बैठक घेण्यात येत आहे. २८ऑगस्ट रोजी खामगाव नांदुरा आणि मलकापूर येथे तर चिखली येथे २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.- अरविंद चावरिया 
जिल्हा पोलीस अधीक्षक