"यजमान' बुलडाणा असला तरी विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा होणार ५ जिल्ह्यांत!; कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी निर्णय

 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील दोनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा धसका आणि ओमिक्रॉनची धास्ती याचा फटका यंदाच्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांनाही बसलाय! यामुळे यजमान बुलडाणा जिल्हा असला तरी स्पर्धा मात्र विभागातील ५ जिल्ह्यांत आयोजित करण्यात आल्या असून, बक्षीस वितरण बुलडाण्यात पार पडणार आहे.

१९ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान टप्प्याटप्याने स्पर्धा पार पडणार असून, स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सामायिक पद्धतीने ही स्पर्धा पार पडणार आहे. यामुळे होणारी गर्दी व कोरोना प्रसार टाळता येईलच पण एकाच जिल्ह्यावर पडणारा आयोजनाचा भार देखील कमी होणार आहे. तसेच मार्च एन्ड प्रभावित होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे. सरोवर नगरी लोणार येथे १९ व २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित क्रिकेट सामन्यांनी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

अमरावतीत २६ व २७ फेब्रुवारीला खोखो, बुद्धिबळ, कॅरम (पुरुष, महिला), थ्रो बॉल, रिंग टेनिसचे सामने रंगणार आहे.  ५ व ६ मार्चला टेबल टेनिस, बॅडमिंटन (पुरुष महिला) लॉन टेनिस स्पर्धा अकोल्यात तर व्हॉलीबॉल, कबड्डी स्पर्धा यवतमाळमध्ये पार पडणार आहे. १२ मार्चला बुलडाणा येथे मैदानी स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा झाल्यावर बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. यंदाचे विजेतेपद कोणता जिल्हा संघ पटकावितो अन्‌ यातही यजमान बुलडाणा जिल्हा चॅम्पियन ठरेल काय? हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.