भक्तांनो, गणपती बाप्पा बसवताय ना..मग "हे" नियम पाळावेच लागतील! गणेशोत्सव मंडळावर राहणार यंत्रणांचा वॉच

 
ganpati

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  उद्या भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक मंडळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यात स्टेज, मंडप,देखावे या बाबींचा समावेश आहे. शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच गणेश मंडळांना स्थानिक  प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीच्या निकषानुसार तेवढ्याच उंचीचा मंडप, वेळेची मर्यादा, ध्वनीप्रदूषणाची मर्यादा पाळणे बंधनकारक असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडास सामोरे जावे लागू शकते.

उद्या ३१ ऑगस्ट रोजी बाप्पांचे आगमन होणार आहे. त्याकरिता बुलडाणेकर सज्ज झाले आहेत. आकर्षक मंडप, स्टेज, देखावा याची तयारी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हाभरात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर वॉच ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे.

परवानगी दिलेल्या आकारातच हवा मंडप..!
  भव्यदिव्य मंडप उभारण्याची स्पर्धा गणेश मंडळात रंगत असते. मात्र नगरपालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या परवानगीनुसारच मंडप उभारावा लागणार आहे.

रात्री १० पर्यंतच आवाज..!
 १० दिवसांच्या गणेशोत्सवात ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियम घालून दिले आहेत.त्यानुसार  रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक यंत्रणा वाजविण्यात येईल. उत्सवादरम्यान काही तक्रार किंवा अडचण असल्यास ११२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.