जिल्ह्यात परतीच्या पावसाने दैना; शासनदरबारी फक्त ६१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद! शेतकऱ्यांना पंचनाम्यावरच संशय; "बुलडाणा लाइव्ह" ला शेकडो शेतकऱ्यांचे कॉल,म्हणाले...

 
shetkari
बुलडाणा( अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दैना झाली. गुडघा - गुडघाभर पाणी सोयाबीनच्या शेतात तुंबल्याने सोयाबीन सोंगायला विलंब झाला. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली याशिवाय मालाचा दर्जाही घसरला. दरम्यान जिल्ह्यातल्या साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६१ हजार हेक्टर क्षेत्र ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीने बाधित झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंचनाम्यावरच संशय आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे रखडले आहेत. शासनस्तरावरून पंचनामे सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी आमच्या शेतात अजून कुणीच अधिकारी आले नाहीत असे शेकडो फोन "बुलडाणा लाइव्ह" ला शेतकऱ्यांनी केले आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यात ६२ हजार ३२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात १९ दिवसांत जिल्ह्यातल्या १२ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. अर्थात ही फेकाफेकी असून वास्तवात नुकसानीचा आकडा मोठा आहे. शासनाच्या पर्जन्यमापक यंत्रातील त्रुटींमुळे अतिवृष्टी कमी क्षेत्रात दाखवण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक नुकसान ग्रस्त शेतकरी शासनाच्या घोळामुळे मदतीपासून वंचित राहतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.