चिखलीतील दादां, भाऊं पोलिसांच्या रडारवर! - ठाणेदार विलास पाटलांचा कारवाईचा दंडूका!७२ वाहनधारकांना २२ हाजाराचा दंड

 
Bulet
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वाहनांच्या क्रमांकांना ‘दादा’, ‘भाऊ’, अशा अक्षरांसारखे आकार देऊन मिरवणाऱ्या किंवा 'जय श्रीराम', 'मोरया', "जय भीम" असे थेट वाहनाच्या नंबर प्लेटवरच लिहून टाकणाऱ्या वाहनचालकांविरोधात  चिखली पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. ठाणेदार विलास पाटील यांनी रस्त्यावर उतरून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ७२ वाहनचालका विरुद्ध केसेस करून २२,००० रुपयांची शनिवारी दंडात्मक कारवाई केली.

चिखली पोलीस ठाण्याचा नव्यानेच पदभार घेतलेल्या ठाणेदार विलास पाटील यांनी अवैध दारू विक्रीवर आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा दंडूका उगारला आहे.अलीकडे वाहनांना ‘फॅन्सी’ क्रमांकाच्या प्लेट बसवण्याचे प्रकार वाढलेत. वाहनांच्या क्रमांकांना वेगवेगळी वळणे देऊन त्यांना अक्षरासारखे स्वरूप देऊन वेगवेगळे शब्द तयार करण्याची क्रेझ चालकांमध्ये वाढत आहे. परंतु वाहतूक नियमांनुसार वाहनांच्या प्लेटवरील क्रमांक स्पष्टपणे आणि दुरूनही समजतील असे असणे बंधनकारक आहे. ‘फॅन्सी’ क्रमांकाच्या प्लेटमुळे नियमांचा भंग होतो. मोटार वाहन कायद्यानुसार अशाप्रकारे वाहन क्रमांक किंवा प्लेटममध्ये छेडछाड करता येत नाही.

वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. दरम्यान फॅन्सी नंबर प्लेट लावने, कागदपत्र न बाळगणे, विनापरवाना वाहन चालविणे,वाहनाच्या सायलेन्सर मध्ये बदल करणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे,रस्त्यात बेशिस्तपणे वाहन उभे करणे अशांवर चिखली शहरातील डीपी रोड, बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खामगाव चौफुली अशा मुख्य चौकात एकूण ७२ वाहनधारका विरुद्ध केसेस करून २२,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे जाणीवपूर्वक पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करून वाहने जप्त करण्यात येईल असा इशाराही ठाणेदार विलास पाटील यांनी दिला आहे.