प्लॉट विक्रीवरून झालेल्या वादातून चिमुकलीच्या विनयभंगाची तक्रार, बुलडाण्यात गुन्हा दाखल

 
535
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ७ वर्षीय चिमुकलीचा शेजाऱ्याने विनयभंग केल्याची घटना २१ एप्रिलला सकाळी साडेदहाच्या सुमारास बुलडाणा शहरातील जांभरून रोड भागात घडली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चिखली रोडवरील प्लॉट विकायचा असल्याने पीडित चिमुकलीच्या आईची प्लॉट विक्री करत असलेल्या संशयिताशी व त्‍याच्या पत्‍नीशी ओळख झाली होती. त्यांची मुलगी व पीडित मुलगी सोबत खेळत असत. त्यानंतर संशयिताच्या पत्‍नीने त्‍यांना सांगितले, की तुमचा प्लॉट विकायचा असेल तर आम्हाला १० टक्के कमिशन लागेल.

त्यामुळे पीडितेच्या आईने त्‍यांना प्लॉट विकण्यास नकार दिला. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबात बोलणे बंद होते. पीडित मुलगी अपार्टमेंटमध्ये खेळत असताना घरी रडत आली. ती का रडत आहे, असे तिला विचारले असता तिने सांगितले, की काकाने माझा हात पकडला. त्यामुळे पीडित मुलीची आई तिला घेऊन संशयिताकडे गेली.

तेव्हा त्‍याने अश्लील भाषेत शिविगाळ करून कोणाला जर काही सांगितले तर आम्ही स्वतःला दुखापत करून तुझ्या व तुझ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अडकवू, अशी धमकी दिली, असे मुलीच्या आईने तक्रारी म्हटले आहे. मुलीचे वडील घरी आल्यावर सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संशयिताविरुद्ध काल, २२ एप्रिलला तक्रार दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जयसिंग पाटील करत आहेत.