एका सरड्याने चिखलीकरांना धरले वेठीस! तासभर अर्धे शहर अंधारात..! वाचा नेमकं काय घडल

 
sarda
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) "एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है" हा नाना पाटेकरांचा डायलॉग अनेकांचा तोंडपाठ आहे. मात्र अर्ध्या  चिखलीकरांना आज एका सरड्याने अक्षरशः वैतागून सोडले. एका  सरड्यामुळे महावितरणचे झाडून पुसून सारेच कर्मचारी कामाला भिडले अन् तब्बल तासाभरानंतर चिखली शहरातील विद्युतपुरवठा सुरळीत झाला.

आता तुम्ही म्हणाल सरड्याने ही करामत केली तरी कशी..तर त्याचे झाले असे की आज,१६ जूनच्या रात्री ८ वाजेपासून चिखली शहरातील बसस्टँड, राऊतवाडी, जिजाऊ नगर, शाहू नगर, गांधी नगर , राऊत वाडी या भागातील वीजपुरवठा अचानक बंद झाला. पाऊसपाणी नाही, वादळवारा नाही तरीही लाईट गेल्याने सगळेच हैराण झाले. महावितरणच्या कार्यालयाचे फोन खणखणत होते..

अचानक झालं तरी काय हे कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कळत नव्हते. सहायक कार्यकारी अभियंता श्री भुसारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या. मात्र बिघाड कुठे झाला हे काळी कळेना..१४ - १५ तज्ञ वायरमन अन् वीसेक सामाजिक कार्यकर्ते बिघाड झाला कुठे हे शोधत होते. प्रत्येक खांबावर जाऊन नेमका प्रॉब्लेम काय हे शोधणे सुरू होते. काहीतरी मोठाच बिघाड झाला असावा अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

प्रॉब्लेम शोधता शोधता महावितरणची चमू खामगाव चौफुलीजवळ  आली. तिथल्या मेन लाईनच्या खांबावर चढल्यावर खरा प्रॉब्लेम समोर आला..अन् एका सरड्याने हा सगळा खेळ पांगवल्याचे समोर आला. अतिशय छोट्या आकाराचा हा सरड्या खांबावर चढला होता..वरच्या दोन मुख्य तारांना स्पर्श केल्याने स्पार्किंग होत होती आणि त्यामुळे लाईट गेल्याचे समोर आले. विजेचा शॉक लागल्याने सरड्याचे दोन तुकडे झाले होते..अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी  तो अडथळा दूर करून वीजपुरवठा सुरळीत केला मात्र एका सरड्याने एवढ्या जणांना कामाला लावल्याने याची चांगलीच चर्चा रंगली.