"बुलडाणा लाइव्ह"च्या वृत्तानंतर मुन्नाभाईंच्या विरोधात चिखलीत डॉक्टरांची एकजूट!; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मांडला ठिय्या!

 
456
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात "मुन्नाभाईंचा" सुळसुळाट  या मथळ्याखाली बुलडाणा लाइव्ह ने जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांबद्दलचे वृत आज, २७ एप्रिल रोजी सकाळी प्रकाशित केले. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून चिखली तालुक्यातील खऱ्या डॉक्टरांनी बोगस डॉक्टरांविरुद्ध तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुपारी ४ वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

 जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अस्तित्वात नसलेल्या पदव्यांचा पाट्या लावून बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. चिखली तालुक्यातील १० गावांतील ५५ बोगस डॉक्टरांची यादी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देऊन अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या दौऱ्यात बोगस  डॉक्टरांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मंत्रीमहोदयांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र समिती नेमण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर काल, २६ एप्रिलला बुलडाणा शहरातील बोगस डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज, चिखली तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. आशुतोष  गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली चिखली मेडिकल असोसिएशन ने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला आहे. २०१८ पासून लेखी तक्रारी देऊनही चिखली तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध अजून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप चिखली मेडिकल असोसिएशनने केला आहे.