जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता! शेतकऱ्यांनो "ही" काळजी घ्याच..
Tue, 19 Apr 2022

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तापमानाचा पारा चाळीशीपार पोहचलेला असतांनाच आता जिल्ह्यात पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात २१ व २२ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने आज, १९ एप्रिल रोजी वर्तविली आहे. १९, २० व २३ एप्रिल रोजी हवामान कोरडे राहील असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२१ व २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या गडगडाडात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. विजा चमकणार असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची व पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी. विजा चमकत असतांना झाडाखाली उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी उभे रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरडे हवामान आणि वाढत चाललेले तापमान लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिके, भाजीपाला व फळबागांना सकाळी किंवा संध्याकाळी ओलित करावे. पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे