प्रतिष्ठेच्या आयर्न मॅन स्पर्धेत बुलढाण्याच्या खेळाडूंचा डंका!देऊळगाव माळी येथील प्रशांत राऊत, संदीप गाभणे यांनी स्पर्धा केली वेळेत पूर्ण

 
jyhh

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):: क्रीडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयर्न मॅन स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या खेळाडूंनी आपला डंका वाजवला. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील प्रशांत राऊत आणि संदीप गाभणे यांनी  ही स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करुन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. जिल्ह्यातील तसेच 
फार्मास्युटिकल मार्केटिंग क्षेत्रातील ते पहिले आयर्न मॅन ठरले आहेत. 

विश्वविख्यात आयर्न मॅन स्पर्धा 13 नोव्हेंबर 2022 रोजी गोवा येथे पार पडली. या स्पर्धेत सहभागी होत प्रशांत आणि संदीप यांनी दिलेल्या वेळेत स्पर्धा पूर्ण केली. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मूळ रहिवासी असलेले प्रशांत राऊत आणि संदीप गाभणे सध्या औरंगाबाद  येथे स्थायीक आहेत. दोघेही नियमित व्यायाम करतात. मागील एक वर्षापासून ते ह्या स्पर्धेची कसून तयारी करीत होते. दोघेही बालमित्र आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने व्यायामाला महत्व दिलेच पाहिजेत, असा सल्ला हे दोघे देतात.

आयर्न मॅन स्पर्धेतील स्पर्धकांना साडेआठ तासांचा वेळ दिला जातो. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात. क्रीडा विश्वात आयर्न मॅन स्पर्धेला अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. सर्वच स्पर्धक या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात

33 देशातील 1450 स्पर्धक सहभागी

आयर्न मॅन स्पर्धेसाठी  33 देशातील 1,450 स्पर्धेक पात्र ठरले होते. आयर्न मॅन स्पर्धा जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा आहे. यामध्ये पोहणे, सायकलिंग आणि धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. गोव्यात झालेल्या स्पर्धेत 1.9 किमी समुद्रात पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमी धावणे याचा समावेश करण्यात आला होता.