भाऊजींच्या कल्पकतेला बुलडाणेकर वहिणींची दाद! क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 
Tyj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिजामाता व्यापारी क्रीडा संकुलमध्ये २४ जानेवारी रोजी रात्री हा बहारदार कार्यक्रम झाला. तळ्यात मळ्यात, फुगे फोडणे, प्रश्न उत्तर, उखाणे, नृत्य अशा सर्वच स्पर्धेत भरभरुन सहभाग नोंदवत बुलडाणेकर वहिणींनी  भाऊजींच्या कल्पकतेला प्रचंड दाद दिली. 

Tguu

राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी  न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला. बुलडाण्यात प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. प्रारंभी क्रांती नाना मळेगावकर यांच्या साईबाबांच्या आराधनेनंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून मालतीताई शेळके यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. राजर्षी शाहू परिवार महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. महिलांनी उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे याकरिता बचतगटांच्या २० हजार महिलांना ७० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी विरंगुळा म्हणून आयोजित नवीन प्रयोगाचे जयश्रीताई शेळके यांनी कौतुक केले. प्रत्येक महापुरुषांनी महिलांचा सन्मान केल्याचे सांगत संदीपदादा शेळके यांनी महिलांचा गौरव केला. संचलन शैलेशकुमार काकडे यांनी केले. 

 

ज्योती धुमाळ ठरल्या होम मिनिस्टर

न्यू होम मिनिस्टर स्पर्धेत ज्योती धुमाळ ह्या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांनी फ्रीज हे प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय पारितोषिक असलेली एलईडी टीव्ही शिवगंगा डुकरे यांना मिळाली. तर श्रद्धा तायडे यांना
तृतीय क्रमांकाचे वाशिंग मशीन पारितोषिक देण्यात आले. याशिवाय पाच मानाच्या पैठण्या आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. मानाची पैठणी जिंकलेल्या स्नेहल कदम यांनी आपले बक्षीस बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यास देऊन नवा आदर्श ठेवला.


संगीताच्या तालावर महिलांचा ठेका 

भाऊजी क्रांती नाना मळेगावकर यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना खिळवून ठेवले. कधी स्टेजवरुन तर कधी प्रत्यक्ष श्रोत्यांत जाऊन त्यांनी उपस्थित महिलांना प्रोत्साहित केले. महिला, युवती, वयस्क  महिलांसह चिमुकल्या मुलींनी सुद्धा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. संगिताच्या तालावर महिलांनी चांगलाच ठेका धरला. लावणी क्वीन विजया पालव यांची लावणी आणि चिमुकल्या सह्याद्रीच्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.