बुलडाणेकरांची होणार पक्ष्यांशी मैत्री! रोमांचक "क्लिक" पाडणार पक्षीमित्रांना भुरळ! नरेंद्र लाजेवरांच्या अकराव्या मासिक स्मृतिदिनानिमित्त अनोखा कार्यक्रम

 
Pakshi
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मैत्रीला बंधन नसतं. पक्षांशी मैत्री होऊ शकते. माणसाप्रमाणेच पशुपक्ष्यांना प्रेम आणि भावना समजतात.तेही मैत्री करतात आणि जपतात.ही मैत्री अधिक घट्ट व्हावी म्हणून, पक्षीमित्र संघटनेचे राज्य सदस्य डॉ.गजेंद्र निकम आज १३ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता आपल्या रोमांचक छंदातील वाइल्ड लाईफ फोटोग्राफीतून विलोभनीय पक्ष्यांचे दर्शन घडविणार आहेत.

येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयात 'ओळख पक्ष्यांची, मैत्री त्यांच्या भावनांशी' हा कार्यक्रम स्वर्गीय नरेंद्र लांजेवार यांच्या अकराव्या मासिक स्मृतिदिनानिमित्त आज होत आहे.

पक्षी मित्र संघटनाचे महाराष्ट्र सदस्य डॉ.गजेंद्र निकम मुख्य मार्गदर्शक म्हणून तर पक्षी मित्र महाराष्ट्र संघटनेचे विदर्भ समन्वयक व निसर्ग कट्टा अकोलाचे संस्थापक अमोल सावंत उपस्थित राहतील. डॉ. वैशाली निकम, क्षितिज निकम, मृण्मयी निकम यांचा सहभाग राहील. वाइल्डलाईफ फोटोग्राफी हा थोडा जोखमीचा पण तेवढाच रोमांचक छंद डॉ. गजेंद्र निकम यांनी जपला आहे. बुलडाणा परिसरातील टिपलेल्या बहुतांश पक्ष्यांची नोंद त्यांच्याकडे आहे. पक्षी निरीक्षण व त्यांच्या विलोभनीय छायाचित्रांचे प्रेझेंटेशन करून ते जीवनसाखळीतील पक्षांचे महत्त्व अधोरेखित करणार आहेत. या कार्यक्रमाला पक्षी मित्रांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगती वाचनालय परिवार, भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक शैक्षणिक मंडळाचे सदस्य तसेच वृक्ष फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.