मोठी बातमी! पोलीस म्हणतात आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारलेली नाही; आयोजकांना स्थळात बदल करण्याच्या केल्या सुचना; जिल्हाप्रमुख बुधवत म्हणाले..

 
budhvat
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार ७ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मेहकर आणि बुलडाणा येथे ते निष्ठा यात्रेला संबोधित करणार आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या बुलडाणा येथील सभेला परवानगी नाकारल्याचा सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज चुकीचा असल्याचे बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारलेली नाही. आयोजकांनी बुलडाणा शहरातील गांधी भवन येथे सभेचे नियोजन केले होते. मात्र ती जागा हायवेला लागून आहे. तिथे शहरातील ५ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शिवाय तिथे जास्त  लोक उभे राहू शकत नाहीत. गर्दीत एखादा अपघात होऊ नये म्हणून त्या स्थळाऐवजी दुसरे स्थळ शोधावे अशा सूचना आयोजकांना दिल्या. त्यांनी त्या मान्य केल्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर म्हणाले.  आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्याचा सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज चुकीचा असल्याचे ते म्हणाले..

 शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणतात..

दरम्यान यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, बुलडाणा शहरातील गांधी भवन परिसरात आदित्य ठाकरेंच्या सभेचे नियोजन केले होते. त्यासाठी गांधी भवन ट्रस्टची परवानगी आम्ही घेतली होती. मात्र पोलिसांनी त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी सभा घेण्याचे सुचवले आहे. गांधी भवनात याआधी अनेक नेत्यांच्या, राजकीय पक्षांच्या सभा झालेल्या आहेत मात्र आमच्याच सभेला जागा बदलण्याची सूचना का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुलडाणा जिल्ह्यात ७ नोव्हेंबरला आदित्य ठाकरेंच्या २ ठिकाणी सभा होतील असेही ते म्हणाले.