बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात भीमसैनिकांचा ठिय्या! जप्त करण्यात आलेले डिजे सोडण्याची मागणी

 
53645
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत नियमांचे उल्लघंन  करण्यात आल्याचा ठपका ठेवून बुलडाणा शहर पोलिसांनी १२ डिजे जप्त केले होते. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करीत आज, १६ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव समितीने ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्रभर जयंती साजरी झाली मात्र केवळ बुलडाणा शहरातच ही कारवाई का असा प्रश्न यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रतिक जाधव यांनी उपस्थित केला. पोलिसांनी केलेली कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप करीत भीमसैनिकांनी तब्बल साडेतीन तास ठिय्या मांडला. जोपर्यंत जप्त करण्यात आलेले डिजे सोडणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने शहर पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ठाणेदार प्रल्हाद काटकर आरटीओ नियमाप्रमाणे दंड आकारून डिजे सोडण्याची तयारी दर्शविल्याने  दुपारी साडेतीनच्या सुमारास ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.