भादोला वासियांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पुन्हा ठिय्या! अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

 
53
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भादोला (ता . बुलडाणा)  येथील ग्रामस्थांनी  बुलडाणा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात  ७ एप्रिल रोजी ठिय्या मांडला होता. गावात सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. तेव्हा तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र १० दिवस उलटूनही कोणतेही काम न झाल्याने आज, १८ एप्रिल रोजी संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

 भादोला गावात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतांना ४ वर्ष उलटूनही नळ योजनेचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजघडीला भादोला वासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठेकेदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

७ एप्रिलला सुद्धा ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले मात्र त्यावेळी ३ दिवसात काम पूर्ण करण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेतले होते. मात्र १० दिवस उलटून अधिकाऱ्यांनी शब्द फिरविल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी भादोला ग्रामपंचायतने नळ जोडणीसाठी गावकऱ्यांकडून प्रत्येकी १०४१ रुपये घेतले होते. अजून नळ जोडणी पूर्ण झालेली नसतांना ग्रामपंचायत पुन्हा ३ हजार रुपये वसूल करीत आहेत.

त्यामुळे १०४१ रुपयांमध्येच नळजोडणी करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलडाणाचे मुख्य कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड हे कार्यालयात हजर नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत.

 या आंदोलनात  संजय गवई, अनंता मिसाळ, राजू गवई ग्रामपंचायत सदस्य रीना आराख, अनिता थिगळे, शबाना बी रज्जाक, शेषराव गवई, मधुकर कांबळे, मंदाबाई गवई, जिजाबाई मिसाळ, मीना मिसाळ, अनुसयाबाई मिसाळ, संगीता मिसाळ, सिंधुबाई गवई, गोदावरीबाई गवई, समाधान जाधव, लक्ष्मण पवार, वंदना मिसाळ, कल्पना मिसाळ, मनीषा जाधव,  छाया पट्टे  यांच्यासह  गावकरी  सहभागी झाले आहेत.