सावधान! कोरोना परततोय..? बुलडाण्यात आरोग्य विभागाला दक्षतेचे निर्देश; मंत्री तानाजी सावंतांनी घेतलेल्या बैठकीनंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक

कोविड संदर्भात चीन, जपान, अमेरिका, कोरिया व
ब्राझील सारख्या देशांमध्ये कोविड रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यात कोविड चे प्रमाण कमी होत असून, या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्ण संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच प्रयोगशाळेचा पॉझिव्हीटि दर ०.२९ टक्क्यांनी घटला आहे. राज्यातील अकोला, पुणे, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्याचा हा दर १ पेक्षा अधिक आहे. राज्यात मागील आठवड्यात १६ रुग्ण भरती झाले. त्यापैकी आठ रुग्णांना आयसीयू ची गरज भासली होती. राज्यात आज १३५ रुग्ण क्रियाशील आहेत. दरम्यान परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य मंत्री सावंत यांनी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाला संबोधित करून दक्षतेचे निर्देश दिले आहेत.
आरोग्यमंत्र्यांनी काय दिले निर्देश?
टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वॅक्सिनेट व कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा, नगरपालिकेने टेस्टिंग वाढवावे, आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. प्रत्येक आरटी, पीसीआरचा बाधित नमुना (सिटी व्हॅल्यू ३० पेक्षा कमी) जनुकीय क्रम निर्धारणासाठी पाठवावा. त्यासाठी राज्यात ७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.चीनमधील बीएफ ७ हा व्हेरियंट भारतात पूर्वी आढळला असला तरी, भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र दक्षता घेणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेने प्रिकॉशन डोसकडे अधिक लक्ष देण्यात यावे. याशिवाय लसीकरण करून घेणे, बाहेर जिल्ह्यातून ,राज्यातून येणाऱ्यांकडे विशेष लक्ष ठेवणे. सरकारी कार्यालयात येणाऱ्यांचे लसीकरण झाले आहे का याची तपासणी करणे. तपासण्याचा वेग वाढवणे अशा सूचना आरोग्य मंत्री सावंत यांनी दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमचंद राठोड यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितले. दरम्यान आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची आज, २२ डिसेंबरला दुपारी ४ वाजता बैठक घेतली.