BULDANA LIVE EXCLUSIVE आम्ही सांगतो, मुले पळविणाऱ्या टोळीच खर खर सत्य ! अपहरणाच्या घटना का वाढल्यात ते वाचाच! आकडेवारी पाहिल्यावर सत्य तुमच्या ध्यानात येईल!

 
buldana
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भलतीच बोंब उठलीय..अल्पवयीन मुले पळवणारी टोळीच जिल्ह्यात सक्रिय असल्याची अफवा पसरली. एकवेळ सत्य समजायला वेळ लागेल पण अफवा मात्र लवकर पसरतात..जळगाव जामोद, डोणगाव, जानेफळ इथे तर बिचाऱ्या निरपराध लोकांना केवळ संशयामुळे मार बसला. खेडो पाडी व्यापार करायला जाणारे, फळ विक्रेते यांच्याकडेही लोक संशयाच्या नजरेने पाहू लागले. काही गावांत तर बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी देखील करण्यात आली. सोशल मीडियावर आलेला मॅसेज वाचायचा ,या गावात असं झालं, तस झालं आणि आपले मत बनवायचे अशा लोकांमुळे ही बोंब जिल्हाभर पसरली. मात्र जिल्ह्यात अशी कोणतीच टोळी नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सुद्धा सांगितले आहे.

 मात्र अशी अफवा का पसरत असेल..तर त्याचे असे आहे की जिल्ह्यातच काय तर संपूर्ण राज्यभरात सध्या लग्नाळू मुले,मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास १ सप्टेंबर ते आज २२ सप्टेंबर २०२२ या २२ दिवसांच्या कालावधीत ५५ जण बेपत्ता झाले आहेत. यात २९ मुली,महिला तर २६ पुरुषांचा समावेश आहे.  बेपत्ता झालेल्या ५५ पैकी ३९ जण हे १८ ते ३० या वयोगटातील आहेत.१८ वर्षांवरील जो कुणीही बेपत्ता होते तो सज्ञान असल्याने पोलीस अशाप्रकरणात केवळ बेपत्ता झाल्याची नोंद करतात. मात्र १८ वर्षाखालील कुणीही बेपत्ता झाले तरी अशा प्रकरणाला अपहरण समजल्या जाते.
     
 अनेकदा १६, १७ वर्ष काही महिने झालेल्या मुली प्रियकरासोबत पळून जातात. १३ ते १७ या वयोगटातील मुलेही कधी रागरागात तर कधी प्रेमप्रकरणात घर सोडतात. मात्र अशांना "सगळ कळत" असल तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून मात्र ते सज्ञान नसतात. त्यामुळे अशा घटनांमध्ये पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. अशा घटना हल्लीच्या काळात बऱ्याच वाढल्यात,  त्यामुळे ते स्वतःहून जात असले तरी चर्चा मात्र अपहरणाची होते.

पालक सुद्धा कारणीभूत...!

मुले  किंवा मुली ज्यावेळेस घर सोडून निघून जातात तेव्हा बऱ्याच पालकांना खर खर माहीत असूनही ते सांगत नाहीत. प्रेमप्रकरणामुळे मुलगा किंवा मुलगी पळून गेल्याचे कळल्यावर समाजात बेइज्जती होईल अशी भीती पालकांना वाटते. त्यामुळे कुणीतरी त्याचे अपहरण केले अशी चर्चा ते स्वतः सुरू करतात. तीच चर्चा वाढत जाऊन त्याची बोंब व्हायला वेळ लागत नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात अगदीच लहान म्हणजे १२ वर्षाखालील मुले घरून निघून जाण्याचा घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे मुले पळवणारी कोणतीही टोळी नसल्याच्या पोलिसांच्या कथनाला दुजोरा मिळतो.