BULDANA LIVE EXCLUSIVE: जिल्ह्यात ६ लाखापेक्षा जास्त घरांवर फडकणार तिरंगा! १३ ते १५ दरम्यान रात्रीही मुभा!! प्रशासनाचे सुसज्ज नियोजन; जिल्ह्यात तिरंगा उत्साहाचा माहौल
यासाठी निमित्त ठरलंय ते भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव आणि त्या अंतर्गत राबविण्यात येणारा 'घर- घर तिरंगा' हा उपक्रम. जिल्हा प्रशासन, शासकीय- निमशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि लाखो सर्व सामान्यजन एकदिलाने एकत्र आले तर काय चमत्कार घडू शकतो याचे हा उपक्रम नव्हे उत्सव एक आदर्श उदाहरण ठरत आहे आणि ठरणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरडीसी दिनेश गीते यांच्या पुढाकाराने सर्व समाजघटक परिश्रम घेत असून सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 'घर घर तिरंगा' ची चर्चा कदाचित राजधानी पर्यंत पोहोचेल असा आजचा माहौल आहे.
६ लाखांवर घरांवर फडकणार तिरंगा!
दरम्यान अमृत महोत्सव निमित्त सर्व नागरिकांना आपल्या घरांवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ( दिवसरात्र) राष्ट्रध्वज फडकविण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी मागील अनेक दिवसांपासून नियोजन व अंमलबजावणीत गुंतलेल्या जिल्हा प्रशासनाने बैठकांचा धडाका लावल्याने यंत्रणा, शैक्षणिक संस्था, कार्यालयेच नव्हे लाखो जिल्हावासी उपक्रमात सहभागी झाल्याचे चित्र आहे. २५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५ लाख १ हजार १२५ तर नागरी भागात १ लाख १३ हजार २५२ घरे आहेत. यामुळे एकूण ६ लाख १४ हजार ३७७ घरांवर तब्बल ३ दिवस तिरंगा रात्रंदिवस दिमाखात फडकणार आहे. यासाठी आवश्यक झेंडे जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे विविध यंत्रणांच्या मदत व समन्वयाने जिल्ह्याभरात वितरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणी विक्री केंद्रे देखील उभारण्यात आली आहे.
तिरंगा लावा पण...
दरम्यान नागरिक व अन्य सर्व समाजघटक यांनी या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. मात्र झेंडा लावताना व लावल्यावर ध्वज संहिता व नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. तिरंगा सुस्थित आहे, तो चुरगळलेला नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन नियोजनात सिंहाचा वाटा असणारे आणि अंमलबजावणीवर करडी नजर ठेवून असणारे आरडीसी दिनेश गीते यांनी केले आहे.