BULDANA LIVE EXCLUSIVE जिल्ह्यात "मुन्नाभाईंचा" सुळसुळाट! दिडहजारांवर बोगस डॉक्टर उठले सामान्यांच्या जीवावर; कारवाईचे सोंग फक्त दिखाव्यासाठी?
डॉक्टर बनण्यासाठी कोणत्याही गल्लीबोळातील संस्थेची बोगस पदवी मिळवली जाते किंवा एखाद्या दुसऱ्याच डॉक्टरचे प्रमाणपत्र लावून दवाखाना थाटल्या जातो. मात्र वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यापैकी एका संस्थेत नोंदणी करणे आवश्यक असते.
त्यानंतरच या संस्थेकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठीचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांकडे यापैकी काहीच नसते. नॅचरोपॅथी, योगा, इलेक्ट्रोपॅथी, इलेक्ट्रोहोमिओपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर अशा अनधिकृत व बनावट शैक्षणिक संस्थांकडील डिग्री दाखवून हे बोगस डॉक्टर आपल्या नावासमोर डॉक्टर लावून राजरोसपणे ऍलोपॅथीची औषधे रुग्णांना देतात.
म्हणून बोगस डॉक्टरांचे फावते..
बोगस डॉक्टर एकतर शहरी वस्तीतील झोपडपट्टी परिसरात किंवा खेडेगावांत दवाखाने थाटतात. गोरगरिबांना शहरात जाणे आणि तिथल्या डॉक्टरांची फी परवडत नाही. शिक्षण नसलेल्या बोगस डॉक्टरची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर बोगस असल्याचे बिचाऱ्या रुग्णांना कळतही नाही. रुग्णही डॉक्टरला त्याची शैक्षणिक पात्रता विचारत नाहीत.
जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या छुप्या आशीर्वादाने बोगस डॉक्टरांची चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे हे बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. कारवाईच्या नावाखाली आरोग्य विभाग तर बोगस डॉक्टरांनाच पत्र लिहून विचारतो की तुम्ही बोगस डॉक्टर म्हणून व्यवसाय करता काय? आणि बोगस डॉक्टर म्हणतात की आम्ही वैद्यकीय व्यवसाय करीत नाहीत आणि आरोग्य विभागाकडून ती फाईल बंद केल्या जाते.
वास्तविक आरोग्य विभागाने धाडसत्र राबवून अशा बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करणे अपेक्षित असताना तालुका आरोग्य अधिकारी मात्र याप्रकरणी कुठलेही धाडसत्र राबवत नाही व धाड घालायची असली तर संबंधित बोगस डॉक्टरांना आधीच कळवून धाड घातली जाते त्यामुळे असे बोगस डॉक्टर दवाखान्याला कुलूप लावून तेथून पोबारा करतात व दोन दिवसांनी असे बोगस डॉक्टर पुन्हा राजरोसपणे आपला गोरखधंदा सुरू करतात. याप्रकरणात पोलिसांना थेट कारवाईचे अधिकार नसल्याने त्यांचे हात बांधले गेले आहेत.
कारवाई करण्यासाठी येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि विशेष म्हणजे राजकीय नेत्यांचे बोगस डॉक्टरांशी असलेले आर्थिक लागेबांधे आणि त्यामुळे राजकीय नेत्यांचा कारवाईत होणारा हस्तक्षेप या कारणांमुळे सुद्धा बोगस डॉक्टरांचे फावले आहे. चिखली तालुक्यातील १० गावांमधील जवळपास ५५ बोगस डॉक्टरांची यादी पूर्ण माहितीसह दिल्यानंतरही चिखलीचे तालुका आरोग्य अधिकारी अनेक महिन्यांपासून कुठलीही कार्यवाही न करता शांतपणे बसलेले दिसतात. काही बोगसडॉक्टरांसोबत असलेल्या 'अर्थ'पूर्ण संबंधातून हे घडते आहे की काय? याची देखील प्रशासकीय चौकशी व्हायला हवी आणि संबंधितांवर कडक प्रशासकीय कार्यवाही करायला हवी अशी मागणी डॉक्टरांमधून होत आहे.
बोगस डॉक्टरांना औषधांचा साठा मिळतो तरी कसा?
बोगस डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा विक्रेत्यांकडून उपलब्ध करून दिल्या जातो. कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना अशा अनधिकृत बनावट डॉक्टरांना औषधांचा पुरवठा होणे ही अतियश गंभीर बाब आहे. बोगस डॉक्टरांना जी औषधे उपलब्ध करून दिल्या जातात त्यात स्टेरॉइड, हायर अँटिबायोटिक्स, एन.एस. ए.आय. डी या औषधांचा देखील समावेश असतो. या औषधांच्या चुकीच्या व अतिरित्क वापरामुळे जिल्ह्यात किडनीच्या विकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
खऱ्या डॉक्टरांवर होतात हल्ले..!
जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. दरवर्षी २०० ते ३०० तरुण महागडे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करतात. मात्र गावागावात आधीपासून दवाखान्याचे दुकान थाटलेले बोगस डॉक्टर हे नव्या डॉक्टर तरुणांना धमक्या देऊ लागतात. काही ठिकाणी बोगस डॉक्टरांकडून खऱ्या डॉक्टरांवर हल्ले सुद्धा झाले आहेत.
बोगस डॉक्टरांशी अधिकाऱ्यांची हातमिळवणी?
कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेल्या बोगस डॉक्टरांची आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी झालेली असते, बोगस डॉक्टरांकडून महिन्याकाठी काही ठराविक रक्कम मध्यस्थांच्या माध्यमातून अधिकाऱ्यापर्यंत पोहचते असा आरोप डॉक्टरांच्या संघटनांकडून अनेकदा केला जातो. या आरोपात तथ्य तर नाही ना असा प्रश्न जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहून कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही.
या सर्व प्रकाराने हतबल झालेले जिल्हाभरातील शेकडो खरे डॉक्टर्स १ मे पासून आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे देखील सूत्रांकडून कळते...