BULDANA LIVE EXCLUSIVE जिल्ह्यात धर्मप्रसाराच्या नावाखाली मिशनऱ्यांचा धर्मांतरणाचा गोरखधंदा!

अंधश्रद्धेचा मांडला बाजार; डोक्यावर हात ठेवून, तेल लावून  दुर्धर आजार बरे करीत असल्याचा दावा! घरातील हिंदू देवांना बाहेर काढण्याचा उपदेश! गोरेगावच्या अनधिकृत केंद्राचा बुलडाणा लाइव्ह ने केला पर्दाफाश; स्टिंग ऑपरेशनमध्ये सगळ चव्हाट्यावर..!
 
pardafast
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय संविधानात प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या प्रचार प्रसाराचे स्वातंत्र्य आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात याच स्वातंत्र्याच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मांतरणाचा गोरखधंदा सुरू केलाय. सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे एका अनधिकृत केंद्राच्या माध्यमातून हा सगळा खेळ सुरू असून तिथे अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय. डोक्यावर हात ठेवून आणि तेल लावून कोणताही आजार बरा होतो, दवाखान्यात जायची गरजच नाही फक्त एकाच देवावर विश्वास ठेवा असा दावा उघडपणे याठिकाणी केल्या जातो. घरातील हिंदू देवदेवतांना बाहेर काढा असे उपदेशही याठिकाणी दिले जातात.  दर रविवारी हा मेळा भरतो..बुलडाणा लाइव्ह ने १७ जुलै रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ह्या सगळ्या बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत..दरम्यान हे केंद्र चालविणाऱ्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

साखरखेर्डा सिंदखेडराजा रोडवर गोरेगाव फाट्यावर धर्मांतरणाचे हे अनधिकृत केंद्र चालते. गोरेगाव येथील दिलीप कव्हळे नामक व्यक्ती हा या केंद्राचा सुत्रधार आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर याआधी अशाच एका प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दर रविवारी या केंद्रावर हजारोंच्या संख्येने लोक येतात. हे स्थळ म्हणजे आमचे प्रार्थनाकेंद्र आहे असा दावा केंद्राच्या संचालकांकडून केल्या जात असला तरी तिथे येणाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने धर्मांतरण करणे हाच उद्देश या केंद्राचा आहे.
   
केंद्रात काय चालत..!

 ब्रेन हॅमरेज, कॅन्सर, मूळव्याध, डोळ्याचे आजार, सांधेदुखी, मणक्याचे आजार असे सगळेच दुर्धर अन् दवाखान्यात बरे न होणारे आजार याठिकाणी बरे होतात असा दावा या ठिकाणी केल्या जातो. विशेष म्हणजे त्यासाठी इथे कोणताच उपचार केल्या जात नाही. कोणतेही औषध दिल्या जात नाहीत. केंद्रातील पास्टर (स्वतःला येशुंचा दुत समजणारा) आजारी व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवतो. पवित्र आत्मा स्पर्श कर..असे  तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटतो आणि नंतर अंगाला लावायला तेल देतो. मी तुमच्यासाठी प्रभुकडे प्रार्थना केली आहे, आता कुठेही जायची गरज नाही, तुमचा आजार बरा होईल असेही आजारी व्यक्तीला सांगण्यात येते. हळुहळु त्या व्यक्तीला एकाच देवावर श्रद्धा ठेवावी  असे सांगत गळ्यातील माळ, डोक्यावरचा गंद, घरातील देवघर काढून टाकण्याचे सांगण्यात येते..! इथे येणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणही मोठे आहे. स्टेजवरचा पास्टर जोरजोरात किंचाळला की काही महिला अंगात भूत संचारल्यासारखं करतात. काहीजण गरगर फिरतात..काही जोरजोरात उड्या मारतात..हे सगळ काय चालू आहे हे नवीन लोकांना मात्र फारसे कळत नाही!
  
गवाही....!
 या केंद्रात प्रार्थनेनंतर आणखी एक कार्यक्रम चालतो तो म्हणजे गवाहीचा..! इथे आल्यानंतर आजार कसे बरे झाले हे सांगण्यासाठी काही ठराविक लोकांना केंद्रचालक पुढे करतात. "मी अनेक दवाखाने केले, लाखो रुपये खर्च केले, १० वर्षांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. तुम्ही जास्त दिवस जगणार नाही असे डॉक्टर सांगत होते, मात्र इथे आल्यावर माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली, अंगाला लावायला तेल दिले आणि चमत्कार व्हावा तसे मी बरा झालो.." असाच गवाही देणाऱ्या प्रत्येकाचा सुर असतो. 

 बुलडाणा लाइव्ह ने काहींना विचारणा केली असता  मेहकरचा दिलीप विष्णू भिसे याने त्याची दारू सुटल्याचा आणि कंबरेतील गॅप तेलामुळे बरा झाल्याचा दावा केला. मेहकरचा खुशाल हिरामण पवार सांगतो की तो दारू पित होता, बायकोला मारहाण करत होता..आता त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याने तो दारू पीत नाही आणि बायकोला मारहाण करत नसल्याचे तो सांगतो. सागर मानवतकर सांगतो की, त्याला मूळव्याध होता, देव धर्म केला, दवाखाना केला फरक पडला नाही.. गोरेगावला आल्यावर पास्टर ने डोक्यावर हात ठेवला मूळव्याध गायब झाला..वाशिम जिल्ह्यातील प्रभाकर जाधव यांनी दावा केला की त्यांचे डोळे खराब झाले होते, सर्दी होती, डोक्यावर हात ठेवल्याने त्यांचे आजार बरे झाले..
  
ख्रिश्चन नव्हे क्रिप्टो ख्रिश्चन..!
  
 गोरेगावच्या या अनधिकृत केंद्रात येणारे बहुतांश लोक हे अशिक्षित असतात. त्यांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेत त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना क्रिप्टो ख्रिश्चन बनवण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे केंद्र चालवणारे संचालक आणि त्यांची टीम सुद्धा आपण धर्म बदलला नसल्याचा दावा करते. पूर्णपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर आहे त्या जातीत मिळणाऱ्या सवलती आणि योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे  पूर्णपणे ख्रिश्चन न बनता क्रिप्टो म्हणजेच छुपा ख्रिश्चन बनून ही मंडळी अंधश्रद्धेचा बाजार मांडतात असे विदर्भ प्रांताच्या धर्मजागरण विभागाचे प्रांत संयोजक पुरुषोत्तम दिवटे यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले.
  
बजरंगदलाचा इशारा, अन्यथा.....!
  दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल चांगलेच आक्रमक झाले आहे. अनधिकृत केंद्र चालणारा दिलीप कव्हळे बेकायदेशीररित्या धर्मपरिवर्तन करत आहे, अंधश्रद्धेचा प्रसार करत आहे, त्याला कायद्याचे भय नाही. त्याचवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, त्याला तात्काळ अटक करावी..हे केंद्र चालविण्यासाठी पैसे कुठून येतात याचीही चौकशी करावी असे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे यांना दिले आहे.. अनधिकृत केंद्र बंद न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने बंद करू असा इशाराही देण्यात आला आहे.
   
ठाणेदार म्हणतात...
 
 यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे निवेदन प्राप्त झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या केंद्रावर जाऊन तिथून आजारी लोकांना दिल्या जात असलेले तेल जप्त केले आहे. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठांची चर्चा करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे ठाणेदार जितेंद्र अडोळे म्हणाले. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही त्यांनी केले.