BREAKING! जंगली प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा ठार; फरफटत तुरीच्या शेतात नेले; बिबट्या, अस्वल, लांडगे की दुसरेच काहीतरी ? चिखली तालुक्यातील मुरादपुर शिवारातील घटना; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कासाबाई श्यामराव गाडेकर ( रा. मुरादपूर,ता.चिखली) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. कासाबाई त्यांच्या शेतात गेल्या होत्या .मात्र संध्याकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला. तेव्हा शेतातील कोठ्याजवळ असलेल्या तुरीच्या शेतातील पट्टीत कसाबाईंचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेहच दिसल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. अंढेरा पोलिसांनी सुद्धा तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जंगली प्राण्याने हल्ला केल्याने महिला ठार झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविल्या जात आहे. महिलेच्या चेहऱ्यावर ,मानेवर जंगली प्राण्यांच्या नखांचे व दातांचे निशाण आहेत. शिवाय महिलेला फरफटत नेल्याचे दिसत आहे. चेहरा फाडण्याचा व मान तोडण्याचा प्रयत्न सुद्धा जंगली प्राण्याकडून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
प्राणी कोणता..?
दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या प्रण्याकडून झाला याबद्दल तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे. या परिसरात लांडग्यांच्या वावर सर्वाधिक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी परिसरातील शिवारात बिबट्या असल्याची चर्चा होती, मात्र याबाबत नेमके सत्य समोर आले नव्हते. अस्वलाचा वावर असल्याचेही परिसरात दिसून आले नव्हते..त्यामुळे हल्ला करणारा प्राणी कोणता? याबद्दल तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.