BREAKING! बुलडाण्यात १२ व १३ तारखेला अतिवृष्टीचा अंदाज, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
Sun, 10 Jul 2022

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भात बहुतेक ठिकाणी पुढील ४ दिवस आणि बुलडाणा जिल्ह्यात १२ व १३ जुलै रोजी अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने दिला आहे.
हवामान खात्याने पुढील ४ दिवस चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यात अतिवृष्टी वा अति-अतिवृष्टी चा इशारा दिला आहे. सागरातील हालचाली लक्षात घेता मान्सून सक्रिय राहील असा अंदाज आहे. बुलडाणा जिल्ह्यात १२ व १३ जुलै ला काही ठिकाणी अतिवृष्टी चा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यादृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
समाधानकारक पाऊस
दरम्यान चालू महिन्यात सर्वच तालुक्यात आजवर समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा १७८ मिमी, चिखली १०२, देऊळगाव राजा १०५, सिंदखेड राजा १४०, शेगाव १०३ या तालुक्यात पावसाने शतक ओलांडले आहे. मेहकर ८७ मिमी, लोणार ९८, खामगाव ७७, मलकापूर ४४, मोताळा ६८, नांदुरा ७८ मिमी अशी अन्य तालुक्यांची आकडेवारी आहे. जळगाव ३९, संग्रामपूर मध्ये मात्र कमी म्हणजे ३८, व ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.