६ नररत्नांचे प्रबोधनही ठरणार कृतज्ञता सोहळ्याचे महा वैशिष्ट्य! कार्यक्रम 'ग्राऊंडफुल ' व अभूतपूर्व ठरण्याची चिन्हे;लोकवर्गणीतून प्रदान लोकरथाचे रविकांत तुपकर करणार सारथ्य

 
gf
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  
एका  शायरने सर्व सामन्यांच्या जीबनाचे वर्णन ' सुबह होती है, शाम होती है, जिंदगी युंही तमाम होती है।  अश्या शब्दात केले आहे. परंतु  असामान्य व्यक्तींच्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजहित, सामाजिक व विधायक, विकासात्मक कामांना, अविरत चळवळीला   वाहिलेला असतो.  अश्याच सहा कर्तृत्ववान   माणसांची  आज,१२ जून रोजी आटपाट बुलडाणा नगरीत हजेरी लाभणार आहे. त्यांना याची देही ,याची डोळा  पाहण्याची अन त्यांचे अभ्यासपूर्ण मनोगत ऐकण्याची संधी हजारो शहर अन जिल्हावासीयांना मिळणार आहे. ज्यांना कल्पनेततही भेटणे कठीण ती  ६ कर्तबगार व्यक्तिमत्व  सर्वसामान्याना समवेत वावरणार अन संवाद साधणार आहे...

jairat

बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी येथे आज संध्याकाळी एक अविस्मरणीय सोहळा पार पडणार आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांसाठी गेल्या दोन दशाकांपासून आपल्या जिवाची पर्वा न करता प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देणारा शेतकरी योद्धा रविकांत तुपकर यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शेतकरी योद्ध्यासाठी तमाम शेतकरी, कष्टकरी व मित्र परिवाराने लोकवर्गणीतून एक चारचाकी वाहन घेतले आहे. सदर वाहन  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शेतकऱ्यांच्या साक्षीने रविकांत तुपकर यांना सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहे. या मान्यवरांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ , पद्मश्री पोपटराव पवार, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज , आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे सचिव ओमप्रकाश शेटे, प्रसिद्ध लेखक, निवेदक व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी संदीप काळे यांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात आदराने घेतले जाणारे एक नाव म्हणजे विठ्ठल वाघ होय. मोजकेच लिहावे पण कसदार लिहावे या बाण्याचे साहित्य यात्री असणाऱ्या या वऱ्हाडाच्या वाघाने ' काळ्या मातीत मातीत ग , तिफन चालते' हे अजरामर काव्य लिहून इतिहास घडविला. आजही ढग जमले, पेरण्याची लगबग दिसली की या पंक्ती आठवतात इतकी त्यांच्या लेखणीत ताकद आहे.पोपटराव पवार यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारनेही घेऊन त्यांना पदमश्री उपाधीने सन्मानित केले. आपल्या हिवरे बाजार या गावाला त्यांनी ग्राम विकासाचे मॉडेल बनविले. राज्य स्तरीय आदर्श ग्राम समितीचे ते अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्राचे बालेकिल्ले ढासळत असताना राधेश्याम चांडक यांनी बुलडाणा अर्बन च्या रूपाने एक चमत्कार घडविलाय! भारतच नव्हे आशिया खंडातील आघाडीची पतसंस्था ही ओळख त्यांचीच नव्हे जिल्ह्याची मान उंचावणारी आहे.

गत ४७ वर्षा पासून  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांना आदर्श मानून सामाजिक प्रबोधनाचा आवाज बुलंद करणारे सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांना परिचयाची गरज नाहीये. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव ओमप्रकाश शेटे व संदीप काळे यांचा परिचय मोठा कॅनव्हास व्यापणारा आहे. पण त्यांना स्वपरिचय पेक्षा आपले काम करण्यात जास्त रुची आहे.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी केलेल्या रेकॉर्डब्रेक कामाला व मदतीला तोड नाही. साहित्यिक ही ओळख असणारे संदीप काळे हे मराठवाडा ते मुंबई अशी स्व कर्तृत्वाने मजल मारणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या बहुतेक पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले आहे. "साहेब" कुणी मेरिट असल्याशिवाय वारंवार त्या व्यक्तीला  वेळ देत नाहीत हे लक्षात घेतले तरी काळेंची उंची लक्षात येते. याशिवाय 'ईन 'चे प्रमुख  आहे. माणसं अभ्यासणे, वाचणे अन त्यांच्याशी निरंतर संपर्क हा त्यांचा छंद असून घनदाट जनसंपर्क ही त्यांची ताकद आहे. 
 
पर्सन मॅनेजमेंटही

 ज्यांच्या साठी हा अट्टाहास त्या स्वाभिमानकार रविकांत तुपकर यांच्या कुतज्ञता सोहळ्याला ही नररत्न हजेरी लावणार हे त्यांचे तर आहेच पण जिल्हा वासीयांचे देखील भाग्य ! या दुर्मिळ महाभागांना एकत्र पाहण्याची, ऐकण्याची संधी तुपकरांनी उपलब्ध करून दिली आहे. ते इन्व्हेंट मॅनेजमेंट मध्ये एक्स्पर्ट आहेतच ,पण पर्सन मॅनेजमेंट मध्ये देखील तज्ज्ञ आहेत हे या कार्यक्रमाने सिद्ध झाले. कार प्रदान चा सोहळा संस्मरणीय आहेच पण या ६ महाभागांना पाहण्याचे भाग्य लाभने   जिंदगी मध्ये एकदाच मिळते. त्यामुळे काही कारणाने तुपकरांचे वावडे असणाऱ्यांनी या नररत्नाचे दर्शन व उद्धबोधन साठी जरूर यावे असाच हा सोहळा ठरणार आहे. आज १२ जुनचा सूर्य अस्ताला जाईल तेंव्हा ६ प्रज्ञा सूर्यानी रेसिडेन्सीच नव्हे मलकापूर मार्ग देखील उजळणार आहे . कुणी हा ज्ञान प्रकाश टाळून 'लोडशेडिंग' मधेच धन्यता मानणार असतील तर तो दोष पडद्यामागील सूत्रधार डॉ गणेश गायकवाड, प्रभुकाका बाहेकर, तुपकर मित्रमंडळ आणि रविकांत तुपकर यांचा निश्चितच राहणार नाहीये!

शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या या ध्येयवेड्या तरुणाने घरदार, संसारावर तुळशीपत्र ठेऊन चळवळीत वाहून घेतले आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात विविध आंदोलने तुपकरांनी केली आहेत. या दरम्यान असंख्य गुन्हे दाखल झाले, कधी पोलिसांचे वार झेलावे लागले, तुरुंगात जावे लागले शिवाय सात जिल्ह्यातून तडीपारही व्हावे लागले परंतु तरीही या नेतृत्वाने चळवळ अन् आंदोलन सोडले नाही. हा नेता पुन्हा पेटून उठला अन् युवा पिढीचा संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा झाला. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळावी यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोेजी बुलडाण्यात रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा निघाला आणि त्यामोर्चापासून विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीन-कापूस आंदोलन पेटले. रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनापुढे राज्य सरकारला झुकावे लागले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. रविकांत तुपकरांनी अगदी दिल्लीपर्यंत सोयाबीन-कापूस आणि पीकविम्याचा प्रश्न रेटून धरला होता.

शेतकऱ्यांसाठी लाल दिव्याच्या गाडीला लाथ मारण्याची धमक या नेत्याने दाखविली. मात्र, तेव्हापासून त्यांना राज्यभर आंदोलने, सभा आणि शेतकरी प्रश्नांसाठी फिरायला स्वत:चे वाहन नाही. मित्र परिवाराच्या सहकार्याने त्यांचा प्रवास सुरु आहे. स्वत:चे आयुष्य समाजासाठी जगणारा, लढणारा असा योद्धा जपणे ही समाजाची जबाबदारी आहे, या भावनेतून शेतकरी व मित्र परिवाराने त्यांना नवे चारचाकी वाहन घेऊन देण्यासाठी लोकवर्गणीचा निश्चय केला आणि पाहता पाहता हा निश्चय पुर्णत्वास गेला. लोकवर्गणीतून साकारलेला हा लोकरथ त्यांना रविवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने सुपूर्द केला जाणार आहे. या अविस्मरणीय अशा कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. गणेश गायकवाड, प्रभुकाका बाहेकर तसेच रविकांत तुपकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.