Amazon Ad

जामोद येथे 'वाजले डफडे!' क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या 'डोळ्यात पाणी!'

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकीकडे ट्यूबवेलच्या क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे विकार बळावले. तर दुसरीकडे ग्रामपंचायतच्या थकीत बिलामुळे जिल्हा प्राधिकरण विभागाने ३ महिन्यांपासून १४० गावे योजनेचा पाणीपुरवठा बंद केल्याने जवळपास २ हजार नळधारकांच्या नशीबी क्षारयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान वैतागलेल्या ग्रामस्थांनी जामोद ग्रामपंचायतीवर डफडे वाजवून यंत्रणेचा निषेध केला.१२ जानेवारीला हे आंदोलन गौतम गवई यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

जामोद ग्रामपंचायत मार्फत ट्यूबवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. नळाला होणारा पाणीपुरवठा क्षारयुक्त होत असल्याने किडनीचे आजार वाढले तर काहींचा बळी गेला आहे. सध्याही जामोद गावात किडनीग्रस्त रुग्ण असून त्यांच्यावर क्षारयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. असे असताना ग्रामपंचायत मात्र पाणीपुरवठा कर वसुली करूनही विज बिल का भरू शकत नाही? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

सरपंच आणि सचिव याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. ग्रामपंचायतच्या थकीत बिलामुळे जिल्हा प्राधिकरण विभागाने १४० गाव योजनेचा पाणीपुरवठा गेल्या ३ महिन्यापासून बंद केल्याने क्षारयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांच्या ''डोळ्यात पाणी''आले आहे. हा क्षारयुक्त पाणीपुरवठा बंद करून १४० गाव योजनेचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी डफडे बजाव आंदोलन केले. आंदोलनात गौतम गवई, रेखा पारवे,कविता गवई, गणेश वानरे यांच्यासह महिला व पुरुष सहभागी झाले होते.