मुलीला मॅसेज केला म्हणून नातेवाईकांचा तरुणाच्या घरात तलवार घेऊन राडा; गाडी फोडली, मोबाईल ठेचला; तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या! बुलडाणा शहरातील धक्कादायक घटना !

 
456
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माझ्या बहिणीला मॅसेज का केला असे म्हणत  मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या घरात घुसून राडा घातला. तरुणाची गाडी फोडली, मोबाईल ठेचला, घरातील महिलांची, मुलींची छेड काढली व मारून टाकण्याची धमकी दिली अन् निघून गेले. गुंडाच्या धाकाला घाबरून तरुणाने थोड्याच वेळात घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन आत्महत्या केली. १९ एप्रिलच्या रात्री दहा वाजता बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवन भागात ही घटना घडली. आदित्य बळीराम येवले (१८, स्वामी समर्थ नगर, सागवन, बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आज, २० एप्रिल रोजी दुपारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

4565

आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार काल, १९ एप्रिलच्या रात्री साडेआठच्या सुमारास  रोहिणी जाधव तिचा भाऊ रोहित उर्फ रबल्या जाधव, विशाल जाधव, अनुज सुरडकर, राहुल सुरडकर असे आदित्यच्या घरात घुसले. त्यावेळी राहुल सुरडकरच्या हातात तलवार होती. तु माझ्या बहिणीला मॅसेज का केले असे विशाल जाधव आदित्यला म्हणाला, तेव्हा आदित्यने आधी तुमच्या बहिणीने मॅसेज केले असे सांगत मोबाईल दाखवू लागला. तेवढ्यात रोहिणीने आदित्यच्या हातातील मोबाईल हिसकला आणि ती मॅसेज पाहू लागली.

रोहिणीच्या हातातून तिचा भाऊ रबल्याने मोबाईल हिसकला आणि घराच्या बाहेर नेऊन मोबाईल दगडाने ठेचला व तोडून टाकला. आदित्यची मोटारसायकल त्यांनी दगडाने फोडून टाकली. आदित्यच्या घरात तोडफोड केली आणि आदित्यला स्टीलच्या रॉडने मारहाण केली. आदित्यला वाचवायला गेलेल्या घरातील महिलांची छेडखानी केल्याचा आरोप सुद्धा आदित्यच्या आईने तक्रारीत केला आहे . तू मर नाहीतर  दोन दिवसांत तुला मारून टाकतो अशी धमकी देऊन मुलीचे नातेवाईक निघून गेले.

त्यानंतर काही वेळाने आदित्य वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. त्याची आई, बहीण त्याला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा आदित्यने खोलीची आतून कडी लावलेली होती. खिडकीतून पाहिल्यावर आदित्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.. घराचा दरवाजा तोडून त्याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
 मृतकांच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात आक्रोश
 या घटनेनंतर मृतक आदित्यच्या नातेवाईकांनी आज,२० एप्रिल रोजी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच आदित्यचे मित्र नातेवाईक सर्वांनी आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली. जोपर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आदित्यच्या नातेवाईकांनी घेतली.

अखेर दुपारी १२ च्या सुमारास आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून  रोहित उर्फ रबल्या जाधव, विशाल जाधव, अनुज सुरडकर, राहुल सुरडकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले असले तरी गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने आरोपींना पळून जाण्यासाठी मदत झाल्याचे बोलले जात आहे. बुलडाणा शहरात अलीकडील वाढलेल्या गुंडगिरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
   
परवा झाला आदित्यचा वाढदिवस 
आदित्यने आत्महत्या केल्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच १८ एप्रिल रोजी आदित्यचा १८ वा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या दिवशी रोहित जाधवची बहीण सुद्धा वाढदिवस साजरा करायला हजर होती. त्या दिवशी तिने रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दोघांमध्ये चॅटिंग झाली होती..यामुळे हा सगळा वाद उफाळून आल्याचे बोलले जात आहे. 

  आरोपींमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याचा समावेश
 आदित्यच्या घरात घुसून धुडगूस घालत त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आरोपी विशाल जाधव हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक असल्याचे समजते.