अन् गोबी पिकाच्या शेतात चक्क मेंढ्या चराई! भाजीपाल्याला नाही भाव; शेतकरी झालाय हैराण! रायपुरच्या शेतकऱ्याची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

 
ltig
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगाचा अन्नदाता असलेला शेतकरी यंदा भयाण संकटात सापडला आहे. आधुनिकतेने जग कितीही पुढे गेले असले तरी  पोटाची खळगी भरण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य आणि भाजीपाला कुठल्या कारखान्यात किंवा कंपनीत तयार होत नाही हेही तेवढेच खरे.यंदा अतिवृष्टी ने जिल्ह्यातला शेतकरी आधीच खचला आहे. त्यात सोयाबीन आणि कपाशी या नगदी पिकांना भाव नसल्यानेही शेतकरी हैराण आहे. अशातच बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील एका शेतकऱ्याची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली आहे. शेतात लावलेल्या गोबी पिकाला भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकात मेंढरे चरायला सोडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात  यामुळे मुर्दाड सरकारचे लक्ष खरचं वेधल्या जाईल का हा प्रश्नही शेतकऱ्याला सतावत आहे.

 गोबी,पालक,मेथी पिकाला भाव नसल्यामुळे त्रस्त झालेल्या रायपूर येथील काही शेतकऱ्यांनी गोबीच्या पिकामध्ये मेंढ्या चरायला घालून शासनाचे लक्ष वेधले. मुन्ना राजपूत या शेतकऱ्यांनी 24 गुंठ्यात गोबी पिकाची लागवड केली होती. ४०हजार लागवड खर्च झाला. परंतु भाव न मिळाल्याने शेतात चक्क मेंढ्या चारल्या. इतरही शेतकऱ्यांनी असाच पवित्रा घेतल्याचे अस्वस्थ चित्र आहे. 

यावर्षी परिसरामध्ये चांगला पाऊस झाला. शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्यांची लागवड केली. परंतुअचानक भाजीपाल्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले. भावात कमालीची घसरण झाल्याने शेतातील भाजीपाला काढायला सुद्धा परवडत नाही. परिणामी शेतकऱ्यांनी कोबी, मेथी, सांबार, पालक या पिकामध्ये चक्क मेंढ्या घालून त्या पिकांचे ट्रॅक्टर द्वारे रोटावेटर करून पिके नष्ट केली आहे. रायपूर परिसरामध्ये जवळपास शंभर शेतकऱ्यांनी कोबीला भाव नसल्यामुळे कोणी शेळ्या मेंढ्या घातल्या तर कोणी गुरे घातले तर कोणी उभ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर द्वारे रोटावेटर फिरवून पिके नष्ट केली आहे. मुन्ना राजपूत या शेतकऱ्याकडे १० एकर जमीन आहे. त्यांनी २४ गुंठ्यात गोबीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी  ४० हजार खर्च आला. परंतु प्रत्यक्षात लागवड खर्चही न निघाल्याने त्यांनी चक्क शेतात मेंढ्या चराई करिता सोडल्या. भाजी पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पिक लागवडीपासून तर पिके येईपर्यंत हजारो रुपयाचा खर्च वाया गेला आहे.