कृषीमित्र सचिन बोंद्रे यांचे एल्गार मोर्चाला समर्थन! गावागावात जाऊन एल्गार मोर्चाचे देत आहेत आवतन; नेत्यांना म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आता तरी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा..

 
sachin

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रात सोयाबीन ,कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे क्षेत्र ६८ टक्के आणि उसाचे क्षेत्र ९ टक्के तरीही उसाच्या भाववाढ आंदोलनासाठी पश्चिम महाराष्ट्रात वणवा पेटतो.मात्र सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार गांभीर्याने घेत नाही. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकजूट झाली तर सरकारला विचार करावाच लागेल. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांनी आयोजित केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य एल्गार मोर्चाला शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, व्यावसायिक व नोकेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते तथा कृषीमित्र सचिन बोंद्रे यांनी केले आहे.

jhf
या एल्गार मोर्चाला शेतकरी पुत्र म्हणून आपण पाठिंबा देत आहोत असेही सचिन बोंद्रे म्हणाले.  यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोयाबीन ,कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झालेली असताना शेतमालाचे भाव पाडण्यात आले आहेत. सोयाबीनचा उत्पादन  एकरी खर्च ३५ हजार आणि उत्पादन  केवळ २० हजार अशी परिस्थिती आहे. एका एकरामागे शेतकऱ्याला १५ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे. सोयाबीनचे भाव ५ हजारांच्या वर जायला तयार नाही. सरकारने आयात निर्यातीच्या धोरणात बदल करण्याची गरज आहे.

सरकारने सोयापेंड आयात करू नये. गोड्या तेलावरील आयात शुल्क वाढवावे. व्यापाऱ्यांवर लावलेली स्टॉक लिमिटची मर्यादा हटवावी. भारतात तयार होणाऱ्या सोयापेंडीच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. सोयाबीन ला प्रतिक्विंटल ८७०० व कापसाला १२ हजार ६०० रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागण्यांसाठी एल्गार मोर्चात  सहभागी होण्याचे आवाहन सचिन बोंद्रे गावोगावी जाऊन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पश्चिम महाराष्ट्रातील नेते जसे पक्ष बाजूला ठेवून एकत्र होतात तसे जिल्ह्यातील, विदर्भातील नेत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे असेही सचिन बोंद्रे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नाचा घास व्यापारी, नोकरदारांच्या ताटात आहे. त्यामुळे अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याला नोकरदार आणि व्यावसायिकांच्याही आधाराची गरज आहे, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने एल्गार मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही सचिन बोंद्रे यांनी केले.