लग्नानंतर १ सोडून १० काढ..पण प्री-वेडिंग फोटोशूट नको ग बाई! चिखलीच्या "त्या" बातमीनंतर पालक होऊ लागले जागरूक! सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया...

 
5yrthyjg
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "लग्न ठरले, साखरपुडा झाला! प्री-वेडिंग साठी गोव्यात एक रात्र दोघांचा मुक्काम..सकाळी उठल्यावर तो म्हणाला, तू पाहिजे तशी नाही मोडले आपले लग्न!" या मथळ्याखाली २४ एप्रिलच्या सायंकाळी बुलडाणा लाइव्ह ने वृत्त प्रकाशित केले. त्या बातमीनंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. अनेकांनी बुलडाणा लाइव्हला फोन करून ते जोडपे कोणते अशी विचारणाही केली..मात्र अशा बातम्यांत नाव जाहीर करायचे नसते असा नियम असल्याने बुलडाणा लाइव्हने तशी माहिती देणे कटाक्षाने टाळले..दरम्यान विविध सोशल माध्यमांत आता प्री-वेडिंग ची चर्चा होऊ लागली असून लग्नानंतर एक सोडून दहा फोटो काढ पण प्री-वेडिंग नको ग बाई अशी भूमिका पालकांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लग्नात हौस पूर्ण करण्याच्या नावाखाली आता प्री-वेडिंग चा ट्रेंड आला आहे. त्यासाठी लग्न ठरलेले जोडपे लग्नाआधीच चार चार दिवस अन् रात्रीही एकत्र घालवतात. त्यावर कळस म्हणजे केवळ "त्या" दोघांनी  पहावे असे त्यांचे फोटो अन् व्हिडिओ  लग्नसोहळ्यात मोठ्या स्क्रीनवर वऱ्हाडी मंडळींना दाखवतात. लग्नात आलेल्या आबाल वृध्दांना आपण काय दाखवतोय याचे भानही "हौस" पूर्ण करण्याच्या नादात त्यांना राहत नाही. आपली संस्कृती काय अन् आपण करतो काय हे त्या जोडप्याला कळत नसले तरी लग्नासाठी शेती गहाण ठेवून कर्ज काढणाऱ्या वरबापाने तरी असा अकारण खर्च करूच नये असेही आता बोलल्या जाऊ लागले आहे.प्री-वेडिंग फोटोशूट साठी गोव्याला गेल्यानंतर एका मुलीने होणाऱ्या नवऱ्यासोबत गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला..

सकाळी उठल्यानंतर तो अचानक बदलला..तू मला पाहिजे तशी नाही असे म्हणत त्याने लग्न मोडल्याची घोषणा केली.त्याने आदळआपट केली..स्वतःच्या अंगावरील कपडे फाडले. तिला दिलेला महागडा मोबाईल मोडला अशी घटना काही दिवसांपूर्वी चिखली तालुक्यात समोर आली होती. घटनेचे वृत्तांकन बुलडाणा लाइव्ह ने केल्यानंतर आता प्री-वेडिंग नकोच अशी भूमिका पालकांनी घ्यायला सुरुवात केली आहे.