आदित्यच्या मित्र परिवाराने बुलडाण्यात काढला कँडल मार्च! आरोपींना अटक करण्याची मागणी

 
aaitya
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुलीच्या नातेवाइकांनी घरात घुसून मारहाण केल्यानंतर बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवनमधील आदित्य बळीराम येवले (१८) या तरुणाने  १९ एप्रिलच्या रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. २० एप्रिलला या प्रकरणी ५ जणांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान काल, २१ मार्चला रात्री ८ वाजता आदित्यचे कुटुंबिय, मित्र व सागवन भागातील नागरिकांनी कँडल मार्च काढून आदित्यला श्रद्धांजली वाहिली. आदित्यला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आदित्यच्या आईच्या तक्रारीवरून रोहित उर्फ रबल्या जाधव, रोहिणी जाधव, विशाल जाधव, अनुज सुरडकर, राहुल सुरडकर ( सर्व रा. बुलडाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी विलंब केल्यामुळेच आरोपी पळून गेले, असा आरोप आदित्यच्या नातेवाइकांनी केला.  बुलडाणा शहरातील विष्णूवाडी ते जयस्तंभ चौक हा कँडल मार्च काढण्यात आला.