बोगस डॉक्टरांवर १५ दिवसांत कारवाई करणार! तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

 
bogus doctor
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मुन्‍नाभाईंचा सुळसुळाट या मथळ्याखाली "बुलडाणा लाइव्ह'ने काल, २७ एप्रिलला वृत्त प्रकाशित केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. जिल्ह्यातील दीड हजारांवर बोगस डॉक्टर सामान्यांच्या जीवावर उठल्याचे बुलडाणा लाइव्हने वृत्तात म्हटले होते. त्यानंतर काल दुपारी चिखली तालुक्यातील डॉक्टरांनी डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर १५ दिवसांत चिखली तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिले.

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार जिल्हा दौऱ्यावर आल्या असता बोगस डॉक्टरांचा मुद्दा चर्चेला आला होता. मंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र चौकशी नेमण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बुलडाणा शहरातील एका बोगस डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चिखली आयुष मेडिकल असोसिएशनने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना ६० बोगस डॉक्टरांची यादी देऊनही त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.

त्यामुळे संतापलेल्या खऱ्या डॉक्टरांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. अखेर रात्री तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन डॉक्टरांना दिले. तालुक्यातील बोगस डॉक्टरांची  माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून घेऊन ही माहिती तालुका बोगस डॉक्टर शोध समितीसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर १५ दिवसांत धाडसत्र राबवून व पंचनामा करून बोगस डॉक्टरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले अाहेत.