९ व्या वर्गातल्या मुलीचे अपहरण; चिखलीच्या श्री शिवाजी विद्यालयात शिकत होती!
Mon, 18 Apr 2022

चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली येथील श्री शिवाजी विद्यालयात शिकणाऱ्या ९ व्या वर्गातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईने तशी तक्रार चिखली पोलीस ठाण्यात १७ एप्रिल रोजी दिली.
मुलीची आई (३४) चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात काम करते. १५ एप्रिल रोजी रोजी मुलीची आई कामाला गेली होती तर दोन्ही मुली घरी होत्या. मोठी मुलगी दुपारी जेवण करून झोपली होती. झोपेतून उठल्यानंतर दुपारी ४ वाजता ती बाहेर गेली मात्र रात्री उशिरापर्यंत घरी पोहचली नाही.
नातेवाईकांनी तिचा चिखली शहरातील बस स्टँड, रेणुका देवी मंदिर परिसर, महादेव मंदिर, मेहकर फाटा, मेरा फाटा सगळीकडे शोध घेतला. मात्र तरीही मुलगी मिळून न आल्याने मुलीच्या आईने तक्रार दिली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केले असावे असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .