उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कारांची घोषणा! स्व.जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशन व सहर ए गझल अकादमीचा पुढाकार

 
jyhgh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अत्यंत मोजक्या शब्दांत बरेच काही सांगण्याचे कसब दोन ओळींत म्हणजे एका शेरात सहज साध्य होते ती असते गझल! अशा गझलेसह उत्कृष्ट साहित्यकृतीला स्व.जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशन व सहर ए गझल अकादमीचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

येथील स्व.जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशन व सहर ए गझल अकादमीच्या वतीने देण्यात येणारे २०२३ चे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.एजान शेख यांच्या"स्वच्छ हृदयाची झरे" या गझलसंग्रहाला स्व.जयराम गायकवाड  गझल   गौरव पुरस्कार, प्रा. मधुकर वडोदे यांनी लिहिलेल्या "जाणे भक्तीचा जिव्हाळा" या साहित्यकृतीला स्व. जयराम गायकवाड भक्ती गौरव पुरस्कार "लाल सावट "या सुभाष किन्होळकर यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीला स्व.जयराम गायकवाड कथा गौरव पुरस्कार, किरण डोंगरदिवे यांच्या "काव्य प्रदेशातील स्त्रीला" या समीक्षा ग्रंथास स्व. जयराम गायकवाड समीक्षा गौरव पुरस्कार,अजय देशपांडे यांच्या साहित्यकृती असलेल्या 'नागरमोथा 'या कथासंग्रहाला स्व.जयराम गायकवाड कथा गौरव सन्मान,सुवर्णा कुलकर्णी व अलका धाडे यांच्या " द क्रिएटिव्ह लॉक डाऊन" या साहित्यकृतीस स्व. जयराम गायकवाड ललित गौरव सन्मान जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यीक डॉ. सदानंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार समितीने वरील सर्व लेखकांच्या साहित्यकृतींचे निवड केली.या लेखकांना व त्यांच्या साहित्य कृतींना १५ जानेवारी रविवारी सायंकाळी ५ वाजता एका विशेष समारंभात गौरविण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण समितीचे संयोजक व स्वर्गीय जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशन तथा सहर ए गझल   अकादमीचे संयोजक सुप्रसिद्ध गझलकार,शायर डॉ. गणेश गायकवाड यांनी दिली.