कोविडमुळे मृत्यू झालेल्या "त्या" जवानाच्या वारसाला ५० लाखांची मदत! पालकमंत्र्यांनी दिला धनादेश

 
123
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या जळगाव जामोद नगरपालिकेतील अग्निशमन दलाचे जवान सैय्यद जमील्लोदीन सैय्यद वकिलोद्दीन यांच्या वारसांना ५० लाख रूपयांची मदत करण्यात आली.

आज,२९ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सैय्यद जमील्लोदीन यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. सैय्यद जमील्लोदीन हे जळगाव जामोद नगरपालिकेत अग्निशामक विभागात कार्यरत होते. गेल्या वर्षी कर्तव्यावर असताना त्यांचा कोरोनमुळे जीव गमवावा लागला होता.  शासनाच्या नियमाप्रमाणे कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रूपयांची मदत देण्यात येते.

त्यानुसार आज सैय्यद जमील्लोदीन यांच्या पत्नी परवीन बी सैय्यद जमील्लोदीन , मुली सनाया अहवाद आणि अलिना कशफ यांना पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते ५० लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. याशिवाय  कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या चिखली तालुक्यातील चिंचोली  येथील वेदांत संतोष सुलताने आणि तुषार संतोष सुलताने या दोन बालकांच्या नावाने प्रत्येकी पाच लाख रूपयांच्या ठेवीचे प्रमाणपत्रही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते देण्यात आले.