कोरोनामुळे अनाथ १३ बालकांना ५ लाखांची मुदत ठेव!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना काळात समाजातील प्रत्येक घटकाला मोठा फटका सहन करावा लागला. जिल्ह्यातील अनेक बालकांनी आपले आई वडील गमावले. ५०७ बालकांचे बालपण हिरावले. १३ बालके आई-वडील दोन्ही तर ४९४ बालकांनी आपले आई किंवा वडील गमावले. त्‍यामुळे शासनाने अशा बालकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. १३ बालकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ५ लाख रुपयांची मुदत ठेव महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शासनाने दिली आहे.

या मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना एक पालक झालेल्या बालकांची संख्या ४९४ असून, पैकी ३३८ बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना प्रति महिना ११०० रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे शासनाने पालकत्वाची भूमिका साकारत कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांचे संगोपण करण्याचा निर्णय घेतला.

केवळ आर्थिक सहाय्य न देता शासनाने अशा बालकांच्या संपत्ती टिकविण्यासाठी कायद्याचा आधार घेत त्याचे संरक्षण करण्याचे कामही केले. तसेच अनाथ झालेल्या बालकांना शासनाने अनाथ प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अनाथ प्रमाणपत्राचे वितरणही केले. त्यामुळे भविष्यात अशा बालकांना अनाथ प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्ती मिळणे सोयीचे होणार आहे.