४ गुंठे जमिनीवरून भावाचे भावाशी वाकडे! लाथा काठ्या अन् धपाधप पडल्या बुक्क्या; भावजयीच्या दातावरही हाणले; देऊळगावराजाच्या गारगुंडी ची घटना

 
Police station deulgaon Raja
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजा तालुक्यातील गारगुंडी गावात बुधवारी राडा झाला. केवळ ४ गुंठे जमिनीच्या वादावरून सख्खे भाऊ एकमेंकांवर तुटून पडले.. लाठ्या काठ्या अन् बुक्क्यांचा धपाधप मार पडला..सख्खा भाऊ अन् पक्का वैरी असं म्हणायची वेळ आली..दरम्यान याप्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्याने मोठ्या भावाने लहान भावाच्या विरोधात तक्रार दिली आहे.
 देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथील बाजीराव मालुजी काकड(६५) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून त्यांचे भाऊ बद्री मालुजी काकड, रमेश मालुजी काकड आणि पुतणे गणेश पुंडलिक काकड आणि ज्ञानदेव बद्री काकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
  तक्रारदार बाजीराव काकड यांचे गारगुंडी शिवारात शेत आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ५ वर्षाआधीच त्यांची भावकीतील हिस्सेवाटणी झाली आहे. गट नंबर ३५८ मधील ४ गुंठे जमीनीवरून त्यांचा लहान भाऊ बद्री आणि रमेश यांच्याशी वाद आहे. दोन्ही भाऊ घराशेजारी राहतात मात्र नेहमी वाकडे राहतात असे तक्रारीत म्हटले आहे.
  घटना २० डिसेंबरच्या सकाळची आहे. तक्रारीनुसार बाजीराव काकड दारासमोर उभे असताना तिथे भाऊ बद्री आणि रमेश काकड आणि पुतण्या गणेश पुंडलिक काकड व ज्ञानदेव काकड आले. "आम्ही शेतातील माल घेऊ देणार नाही, गट न २९० मधील कापूस वेचून आणला आहे, शेताचा आणि विहिरीचा हिस्सा देणार नाही" असे म्हणत बाजीराव काकड यांच्याशी त्यांच्या भावांनी वाद घातला. बाजीराव काकड यांनी भावांना आणि पुतण्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र पुतण्या ज्ञानदेव काकड यांनी हातातील काठी करंगळीवर हाणली, वडिलांना होत असलेली मारहाण पाहून बाजीराव काकड यांचा मुलगा बंडू आणि पत्नी हरणाबाई धावत आल्या. यावेळी त्या दोघांना देखील लाथा काठ्या आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बाजीराव काकड यांचा भाऊ रमेश याने भावजयीच्या दातावर हाणले..यावेळी गावकऱ्यांनी सोडवणूक केली. हाणामारीत बाजीराव काकड यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याचे तक्रारीत म्हटले. पुढील तपास सुरू आहे.