जिल्हा योजनेतून विकासकामांसाठी यंदा ३७० कोटींचा निधी ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

 
dhdhd

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): जिल्हा नियोजन व विकास योजनेतून जिल्ह्याला यंदा ३७० कोटी रुपयांचा निधी येत्या वर्षात मिळणार आहे. मात्र या निधून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये यंदा आमूलाग्र बदल करण्यात आला असून संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या मदतीने विभागांना थेट कामे सुचवावी लागणार आहेत.

त्यातूनच नंतर जिल्हा विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात येत्या वर्षाच्या आराखड्याबाबत २५ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी  सुनय लाड, सांख्यिकी उपसंचालक जयंत अढाव प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी यावर्षी नियोजन विभागास विविध विभागांनी सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली. यापूर्वी केवळ गाभा, बिगर गाभा अशा प्रकारे माहिती सादर करण्यात येत होती. आता यात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्याची बलस्थाने, मागासपणा आणि धोके लक्षात घेऊन अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीची कामे प्रस्तावित करण्यात येणार आहे.

यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनामधून तयार करण्यात येणाऱ्या आराखड्यात आता थेट कामे सूचवावी लागणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तुम्मोड म्हणाले जिल्ह्याची अवलंबिता कृषी क्षेत्रावर अधिक आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जादा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राचा विकास करताना कृषी पुरक व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे व्हिजन डाक्युमेंट लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये करावयाची कामे हाती घेण्यात येणार आहे. यात प्रत्येक कामनिहाय नियोजन केले जाईल. नियोजनमधून करण्यात येणाऱ्या कामाबाबत राज्यस्तरावरील अपेक्षा लक्षात घेऊन कामे करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले यावेळी जिल्ह्याच्या विविध मानकाबाबत जिल्हा सांख्यिकीतर्फे सादरीकरण करण्यात आले. यात जिल्ह्याची वेगवेगळ्या क्षेत्रात असलेली कामगिरी आणि येत्या काळात करण्यात येणाऱ्या कामामध्ये असलेल्या संधींबाबत माहिती देण्यात आली.