२४ तास उलटून गेले अजूनही शिवणी जाटच्या समाधान सरकटेंचा शोध लागेना! काल गेले होते पुरात वाहून;संदीप शेळकेंची गावात धाव, आपदग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी असल्याचा शब्द ​​​​​​​

 
kvkvjxcv
लोणार(प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील शिवणी जाट गावात काल,४ जुलैच्या दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यावेळी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या तिघांपैकी एक असलेल्या समाधान श्रीराम सरकटे (४८) यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या शोध व बचाव पथकाच्या वतीने त्यांचा शोध सुरू आहे. मात्र शोधकार्यात अडथळे येत आहेत. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप    शेळकेंनी आज शिवणी जाट गावात जाऊन आपदग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन आधार दिला. या संकटसमयी राजर्षी शाहू परिवार आपल्यासोबत आहे असे संदीप शेळके यावेळी म्हणाले.
 

समाधान सरकटे काल मजुरीसाठी शेतात गेले होते. कामावरून परत येत असताना पुलावरून बैलाचा पाय घसरल्याने   बैलगाडी ओढ्यात उलटली. पुराच्या पाण्यात वाहून जातांना सरकटे यांच्या दोन सहकाऱ्यांच्या हातात झाडाच्या मुळ्या लागल्याने ते वाचले.मात्र समाधान सरकटे पुराच्या पाण्यात वाहून गेले. यावेळी बैलगाडीचा एक बैल देखील मृतावस्थेत सापडला. दरम्यान कालपासून समाधान सरकटे यांचा शोध सुरू आहे मात्र २४ तास उलटून देखील ते सापडले नाहीत. ते वाहून धरणात गेले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान आज राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळकेंनी शिवणी जाट येथे जाऊन शोधकार्याचा आढावा घेतला. पिडीत कुटुंबाला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी घटनास्थळी उपस्थित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. या संकट समयी राजर्षी शाहू परिवार आपल्या सोबत आहे असा शब्द देत संदीप शेळके यांनी आपदग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले.

 लोकप्रतिनिधी गायब..सत्तेच्या खेळात बिझी?

 ही दुर्दैवी घटना घडून २४ तासांपेक्षा अधिक वेळ उलटून गेला आहे. शोधकामासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न होत असले तरी स्थानिक लोकप्रतीनिधी मात्र अद्याप गावात पोहचले नाहीत. एका बळीने त्यांचे बिघडत नाही, त्यांना सत्तेचा खेळ महत्वाचा आहे अशा शब्दात एका गावकऱ्याने आपली नाराजी व्यक्त केली.