कारसेवक वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ २ लाख २१ हजार दिव्यांचे वाटप! स्व.वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अजय उमाळकर यांचा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनोखा उपक्रम...
Jan 15, 2024, 20:31 IST
मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राम मंदिराचे स्वप्न उरात धारण करून अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प मनात ठेऊन कारसेवेमधे निर्भयतेने सहभागी होणारे अगणित रामभक्त आपले तन मन धन समर्पित करून झटत होते. पक्ष, विचारधारा तथा पंथ बाजुला ठेऊन आपल्या श्रद्धा श्रीरामाप्रती दृढ करणारे लाखो कुटुंब भारतात आहेत. जगायचे तर रामासाठी आणि मरायचे तर रामासाठी ही भावना अनेकांची होती. प्रकृती आणि परिस्थिती यांचा विचार न करता श्रीरामाला जन्मभूमित प्रतिष्ठापीत करण्यास्तव स्वतःला कारसेवेत झोकून देणारांमधील मेहकर येथील पहिल्या कारसेवेतील कारसेवक स्वर्गीय अरविंद उमाळकर आज हयात नाहीत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे पुत्र अजय उमाळकर हे जिल्हाभरात २ लाख२१ हजार दिव्यांचे वाटप करणार आहेत.
येत्या २२ जानेवारीला रामलला अयोध्येत विराजमान होणार आहेत. या दिवशी देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षी होण्याकरिता हजारो कारसेवकांनी कारसेवा केली होती. येथील रहिवाशी स्व.अरविंद उमाळकर हे सुद्धा पहिल्या कार सेवेसाठी इतर कारसेवकां सोबत मेहकर वरून गेले होते. अयोध्येत मंदिर व्हावे या करिता परिणामाची चिंता न करता देशभरातून त्यावेळी कारसेवक अयोध्येला पोहचले होते. त्यांनी त्याकाळी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा या हेतूने स्वर्गीय उमाळकर यांचे पुत्र तथा स्थानिक महाराष्ट्र अर्बन कॉ. क्रे.सोसायटीचे कार्यकारी संचालक अजय उमाळकर यांनी २ लाख २१ हजार दिवे वाटपाचा संकल्प केला आहे.
जिल्हाभरातील ४ हजार कुटुंबीयांना प्रत्येकी पाच दिवा वातीचा संच दिला जाणार आहे.येथील मँगो रेसिडेन्सीच्या च्या हॉल मध्ये राजु जयस्वाल, गणेश महाजन,प्रशांत सावजी, मंगेश खेर्डीकर, विष्णू बाजड, बबन तुपे, पुरुषोत्तम शर्मा, सुभाष सास्ते, शंकर पवार, सुरेश मुंदडा, विजय महाले,प्रदीप शेळके, विष्णुपंत खंदारकर सह महीला रामभक्त दिवा (बांधणी)पॅकिंग चे काम मागील तीन दिवसांपासून करीत आहेत. उद्या, मंगळवार पासुन जिल्हाभरात या दिव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
असे अजय उमाळकर यांनी बुलडाणा लाईव्ह शी बोलतांना सांगितले.