बुलडाण्यातील शिवस्मारकासाठी आणखी २ कोटी!

 
शिवस्मारक
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील बसस्थानकावरील संगम चौकात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकासाठी आणखी २ कोटी रुपयांचा राज्‍य शासनाने निधी मंजूर केला आहे.

सध्या संगम चौकात शिवस्मारक उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी आणखी निधी उपलब्ध झाल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशातील सर्वात उंच व भव्य असे शिवस्मारक बुलडाण्याच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ३ कोटी रुपये अन्य महापुरुषांच्या स्मारकासाठी वापरण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील वीर शिवा काशीद यांच्या नियोजित स्मारकासाठी ७८ लाख रुपये, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी २४ लाख तर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २० लाख, बुलडाणा- मलकापूर राज्य महामार्गारील नगरपरिषद हद्दीत शहराच्या उत्तरेस प्रतापगड प्रवेशद्वार बांधकाम करण्यासाठी ३४ लाख, बुलडाणा -चिखली राज्यमार्गावर नगर परिषद हद्दीवर शहराच्या दक्षिणेस सिंहगड प्रवेशद्वार बांधकाम करण्यासाठी ३५ लाख, प्रभाग क्रमांक ११  मध्ये सर्किट हाऊस परिसरात उत्तर पूर्व कोपऱ्यातील खुल्या जागेत स्वर्गीय वसंतराव नाईक चौक विकसित करण्यासाठी ३४ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.