१७,६१,५७५ मतदार ठरवणार बुलडाणा लोकसभेचा खासदार! युवा मतदारांना साद घालणारा उमेदवार गाठणार दिल्ली, कारण....

 
तरुण
बुलडाणा(अनंता काशीकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका जवळ आल्यात..जिल्हा प्रशासनाला त्यादृष्टीने तयार राहण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.त्यामुळे जिल्हाप्रशासन प्रशासकीय पातळीवरून आवश्यक ती तयारी करीत आहे. आजघडीला बुलडाणा लोकसभा मतदारसंघात १७ लाख ६१ हजार ५७५ मतदार आहेत, त्यातही १८ ते ३९ या वयोगटातील आकडा मोठा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जो उमेदवार तरुण मतदारांना विकासाची दिशा दाखवेल तोच उमेदवार दिल्ली गाठेल अशी चिन्हे आहेत.
 बुलडाणा जिल्ह्यात एकूण १३ तालुके आणि ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि जळगाव जामोद हे मतदारसंघ बुलडाणा लोकसभा क्षेत्रात येतात. सध्या नवीन मतदार नोंदणी अभियान प्रशासनाने हाती घेतले आहे, त्यात १८ वर्षे पूर्ण झालेल्यांचे नाव मतदार यादीत नोंदणे,मृत झालेल्या व्यक्तींचे नाव यादीतून वगळणे तसेच वेगवेगळ्या कारणांनी बाद झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजघडीला २० लाख ३८ हजार ९७७ मतदार आहेत, त्यात १० लाख ६८ हजार ६२८ पुरुष मतदार तर ९ लाख ७० हजार ३१९ महिला तर ३० तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. यातील २ लाख ७७ हजार ४०२ मतदार मलकापूर विधानसभा क्षेत्रातील आहेत, ते वगळता उर्वरित १७ लाख ६१ हजार ५७५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील आहेत,अंतिम यादीनंतर हा आकडा वाढणार आहे..
 तरुण मतदारांची संख्या अधिक...
जिल्ह्यात एकूण मतदारांपैकी ४५ टक्के मतदार हे १८ ते ३९ या वयोगटातील आहेत. यातील बहुतांश मतदार हे शिक्षित आहेत, त्यामुळे नव्या पिढीला विकासाची साद घालणारा उमेदवारच दिल्ली गाठण्यात यशस्वी होणार आहे..